शिक्षकांच्या बदल्या फेब्रुवारीपर्यंत न करण्याची शिक्षक समितीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2017 05:53 PM2017-10-06T17:53:37+5:302017-10-06T17:53:37+5:30
फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
सांगली , दि.६ : सध्या शिक्षकांच्या बदल्यांबाबत अस्थिर वातावरण आहे. बदल्यांच्या यादीतही मोठ्या प्रमाणात घोळ घालण्यात आला आहे. शिक्षक समितीने उच्च न्यायालयात बदल्यांबाबत दाखल केलेल्या याचिकेवर स्थगिती आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करू नयेत, बदल्या झाल्यास तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असे शिक्षक समितीचे राज्य कोषाध्यक्ष किरण गायकवाड, जिल्हाध्यक्ष सयाजीराव पाटील, सरचिटणीस बाबासाहेब लाड यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
ते म्हणाले की, शिक्षकांच्या बदल्यांबाबत समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरील पुढील सुनावणी २८ फेब्रुवारी २०१८ रोजी होणार आहे. तोपर्यंत जैसे थे स्थिती कायम ठेवण्याचे न्यायालयाचे आदेश आहेत.
यासंदर्भात वकिलांचे पत्र जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व ग्रामविकास सचिवांना दिले जाणार आहे. न्यायालयाचा आदेश असल्याने फेब्रुवारीपर्यंत कोणत्याही बदल्या करता येणार नाहीत. अन्यथा तो न्यायालयाचा अवमान ठरेल, असेही ते म्हणाले.
शिक्षकांच्या बदल्यांबाबत शासनस्तरावर मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. बदल्यांच्या याद्याही सदोष आहेत. शासनाने प्रसिद्ध केलेल्या २९५ बदल्यांसंदर्भात दीडशे शिक्षकांनी हरकत नोंदवली आहे.
बदल्यांना स्थगिती असल्याने शिक्षकांनीही भयभीत होऊ नये. यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने शनिवारी सर्व संघटनांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत शिक्षकांच्या बदल्या करण्यास समितीकडून विरोध केला जाईल, असेही किरण गायकवाड यांनी स्पष्ट केले.