वेतन पथकाकडून शिक्षकांची आर्थिक कोंडी
By Admin | Published: November 4, 2015 11:22 PM2015-11-04T23:22:04+5:302015-11-04T23:58:43+5:30
‘चहापाण्या’ची मागणी : वर्षभरापासून पगारच नाही!
सांगली : अन्य जिल्ह्यांतून सांगली जिल्ह्यात बदली होऊन आलेल्या कनिष्ठ महाविद्यालयातील काही प्राध्यापकांचा पगार गेल्या वर्षभरापासून झालेला नाही. पगाराबाबत माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथक कार्यालयातील कर्मचारी ‘चहापाण्या’ची मागणी करत असल्याचे समजते. वेतन पथकातील काहीजण आर्थिक कोंडी करून, खिसे भरत आहेत, अशा तक्रारी आहेत.
एका शिक्षण संस्थेच्या कनिष्ठ महाविद्यालयातील काही प्राध्यापकाची संस्थेंतर्गत दुसऱ्या जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यात बदली झाली. बदलीनंतर माध्यमिक शिक्षण विभागाकडे कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. वेतन पथकाकडेही सर्व कागदपत्रे दिली आहेत, परंतु पगार झाला नसल्याने महाविद्यालयातील लिपिकाकडे विचारणा केली. त्याने सर्व पूर्तता करून प्रस्ताव पाठविला असून वेतन पथकाकडे तो प्रलंबित असल्याचे सांगितले. याचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर ‘चहापाण्याचे काही तरी बघा’ असे सांगण्यात आले. शिक्षकांचा सुमारे वर्षभराचा पगारच झालेला नाही. पगाराची थकित रक्कम मोठी असल्यामुळे वेतन पथकातील लिपिकांच्या तोंडाला पाणी सुटले असून, त्यांनी ‘चहापाण्या’साठी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष निरोप दिल्याचे समजते. काही शिक्षकांनी ‘चहापाणी’ देण्यास नकार दिल्यामुळे त्यांचा गेल्या वर्षभरापासून पगारच केला नसल्याची तक्रार आहे. कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, माध्यमिक शाळेतील शिक्षकांना थकित पगार, वैद्यकीय बिले यासाठी ‘चहापाणी’ करावे लागत असल्याची चर्चा आहे. वेतन पथकाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. (प्रतिनिधी)
नियमित शिक्षकाचा पगार थांबलेला नाही : दिलीप पाटील
माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, प्राध्यापकांची नियमित नियुक्ती असेल, तर त्यांचे पगार थकित नाहीत. परंतु, अर्धवेळ शिक्षक व कनिष्ठ प्राध्यापकांची नियुक्त असेल, तर राज्य शासनाच्या आदेशामुळेच पगार थांबविले होते. काही अर्धवेळ शिक्षकांची संचमान्यता झाली नव्हती, म्हणून सप्टेंबरपासून पगार थकित होता. संचमान्यता मिळालेल्या शिक्षकांचाही सप्टेंबरचा पगार मागील आठवड्यात जमा केला आहे. आॅक्टोबरचा पगार दोन दिवसात होईल. वर्षभरापासून एकाही कनिष्ठ प्राध्यापकाचा पगार थकित नाही. जर एखाद्याचा पगार थांबला असेल, तर त्यांनी थेट माझ्याशी संपर्क करावा, तात्काळ तो प्रश्न सोडविण्यात येईल, अशी प्रतिक्रिया वेतन पथकाचे प्रभारी अधिकारी दिलीप पाटील यांनी दिली. याबाबत शिक्षकांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहनही त्यांनी केले.