शिक्षकांनी जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श विद्यार्थी घडवावेत, मंत्री सुरेश खाडेंचे प्रतिपादन
By अशोक डोंबाळे | Published: September 11, 2023 06:26 PM2023-09-11T18:26:35+5:302023-09-11T18:27:58+5:30
खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला
सांगली : मॉडेल स्कूलच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध केल्या आहेत. झेडपीच्या शाळेने आजपर्यंत अनेक आदर्श व्यक्ती घडविल्या आहेत. शिक्षकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आदर्श विद्यार्थी घडवावेत असे प्रतिपादन पालकमंत्री सुरेश खाडे यांनी केले.
जिल्हा परिषदेतर्फे जिल्ह्यातील दहा शिक्षकांचा आदर्श पुरस्काराने गौरव केला. यावेळी ते बोलत होते. खासदार संजय पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, प्राथमिक शिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी राजेसाहेब लोंढे आदी उपस्थित होते.
खाडे म्हणाले, शाळांमध्ये भौतिक सुविधा होण्यासाठी निधीची कमतरता भासणार नाही. मात्र, मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. यासाठी शिक्षकांनी प्रामाणिक प्रयत्न करावेत. खासगी शाळेतून जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेण्याकडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढला आहे. देण्यात आलेले पुरस्कार पारदर्शकपणे निवड करून देण्यात आले आहेत. सर्वच शिक्षक चांगले शिक्षण देतात. मात्र, त्यातील उत्कृष्ट शिक्षण देणाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
...या शिक्षकांचा झाला गौरव (शिक्षक, शाळेचे नाव)
विष्णू ओमासे (सिद्धेवाडी, ता. मिरज), तानाजी कोडग (ढालेवाडी, ता. कवठेमहांकाळ), अप्पासाहेब सौदागर (लंगोटे वस्ती, हळ्ळी, ता. जत), सुनील तावरे (शाळा नं. २ सावळज, ता. तासगाव), अविनाश दाभोळे (घोटी बु., ता. खानापूर), भीमराव सांवत (घरनिकी, ता. आटपाडी), संगीता परीट (नरसिंहगाव, ता. वाळवा), करुणा मोहिते (निगडी, ता. शिराळा), बाबासो शिंदे (उपाळेवांगी, ता. कडेगाव), राम चव्हाण (शाळा नं. १, ता. पलूस).