पगार खाती असणाऱ्या शिक्षकांना कर्ज देण्याची शिक्षक संघाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2020 05:10 AM2020-12-05T05:10:29+5:302020-12-05T05:10:29+5:30
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पगार खाती नुकतीच मध्यवर्ती बँकेकडून राष्ट्रीयीकृत बँकेकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. तासगाव तालुक्यातील बहुतांश प्राथमिक ...
सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची पगार खाती नुकतीच मध्यवर्ती बँकेकडून राष्ट्रीयीकृत बँकेकडे वर्ग करण्यात आलेली आहेत. तासगाव तालुक्यातील बहुतांश प्राथमिक शिक्षकांची पगार खाती बँक ऑफ महाराष्ट्रकडे आहेत. शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी नुकतीच शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाने महाराष्ट्र बँकेचे शाखा अधिकारी दर्शन पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी शिक्षकांना पाच वर्षे मुदतीचे जे पर्सनल लोन दिले जाते, त्याची मुदत कमी असल्यामुळे कर्ज कमी मिळते. त्यासाठी कर्जाची मुदत दहा वर्षे इतकी वाढवावी व वीस लाखांपर्यंत पर्सनल लोन द्यावे. तसेच तसेच शिक्षकांना क्रेडिट कार्डसह बँकेच्या इतरही सुविधा द्याव्यात, अशी मागणी करण्यात आली.
शाखाधिकारी पाटील यांनी या मागण्यांना सकारात्मक प्रतिसाद देत वरिष्ठ कार्यालयाकडे संपर्क करून शिक्षकांच्या या मागण्या पूर्ण करू, असे सांगितले. त्यामुळे लवकरच शिक्षकांना नऊ ते दहा टक्के व्याजाने वीस लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे.
शिष्टमंडळामध्ये शिक्षक संघाचे सरचिटणीस अविनाश गुरव, शब्बीर तांबोळी, श्रीकांत पवार, नंदकुमार खराडे, मंगेश गुरव, राजाराम कदम, निशिकांत परदेशी, सरफराज मुल्ला, दिलीप पाटील, संजय पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.