शिक्षकांच्या जागा रिकाम्या : २० पैकी १९ जागा पूर्व

By Admin | Published: August 13, 2016 11:41 PM2016-08-13T23:41:11+5:302016-08-14T00:28:24+5:30

भागातच रिक्त, पालकांत तीव्र नाराजी, शैक्षणिक नुकसान

Teacher's vacancy: 19 out of 20 seats are available | शिक्षकांच्या जागा रिकाम्या : २० पैकी १९ जागा पूर्व

शिक्षकांच्या जागा रिकाम्या : २० पैकी १९ जागा पूर्व

googlenewsNext

पांडुरंग डोंगरे -- खानापूर --चालू शैक्षणिक वर्षापासून खानापूर जिल्हा परिषद गटामधील तब्बल दहा ते बारा जि. प. शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. त्यामुळे खानापूर घाटमाथ्यावरील प्राथमिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची मोठी कुचंबणा होत असून त्यांची शैक्षणिक प्रगती खुंटली आहे.
खानापूर तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त असणाऱ्या वीस जागांपैकी एकोणीस जागा खानापूर गटातील केंद्रातच आहेत. याबाबत संबंधित विभागाकडे वारंवार मागणी करूनही उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थ व पालक वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. सांगली जिल्ह्यात जि. प. शाळेमधील प्राथमिक शिक्षकांच्या बऱ्याच जागा रिक्त आहेत. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होऊन दोन महिने पूर्ण झाले. तरीही या जागा अद्याप रिक्तच आहेत. जिल्ह्यात शैक्षणिक दर्जा, गुणवत्ता वाढ यामध्ये खानापूर तालुका आघाडीवर आहे. ‘अ’ श्रेणीच्या शाळाही सर्वाधिक आहेत. शैक्षणिक प्रगतीत अग्रेसर असणारा हा तालुका शिक्षकांच्या रिक्त जागांमध्येही अग्रेसर राहिला आहे. त्यामुळे पुढील काळात खानापूर तालुक्यामधील शिक्षणाचा दर्जा टिकणार का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. तालुक्याची शैक्षणिक प्रगती रोखण्यासाठी रिक्त जागांचा प्रश्न निर्माण केला काय? असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे रिक्त जागांबाबत तालुक्यात उलट-सुलट चर्चांना ऊस आला आहे.
खानापूर तालुक्यात शिक्षण विभागाची नऊ केंद्रे असून १०५ शाळा आहेत. यातील तब्बल ८४ शाळांचा समावेश ‘अ’ श्रेणीत आहे, तर २२ शाळा ‘ब’ श्रेणीत आहेत. तालुक्यामधील एकही शाळा ‘क’ किंवा ‘ड’ श्रेणीत नाही. विशेष म्हणजे चालू वर्षी जि. प. शाळेचा तालुक्यातील पट २५२ ने वाढला आहे. पहिलीच्या वर्गातील प्रवेशही यावर्षी वाढले आहेत. गेल्या पाच वर्षापासून खानापूर तालुका शिक्षण विभागात उल्लेखनीय वाटचाल करीत आहे. ही वाटचाल जिल्ह्यातील इतर तालुक्यांना आदर्शवत ठरणारी आहे. अशा स्थितीत तालुक्यात शिक्षकांची वीस पदे रिक्त ठेवून काय साध्य होत आहे? असा यक्षप्रश्न उपस्थित झाला आहे.
शिक्षक भरती बंद असल्याने रिक्त जागांचा प्रश्न समोर आला आहे. हे खरे असले तरी, रिक्त जागा सर्व तालुक्यात समान स्वरूपात राहिल्या पाहिजेत. परंतु तसे न घडता ठराविक तालुक्यातच जादा रिक्त जागा कशा राहिल्या? त्यातही खानापूर तालुक्यातील खानापूर गटातच सर्वाधिक रिक्त जागा वाटपास येण्याचे कारण काय? असाही प्रश्न पालकांना पडला आहे.
खानापूर जिल्हा परिषद गटात खानापूर, पळशी व रेणावी ही तीन केंद्रे आहेत. यापैकी खानापूर केंद्रात चार, पळशी केंद्रात बारा, तर रेणावी केंद्रात तीन शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. खानापूर केंद्रातील व तालुक्यातील सर्वात मोठी जि. प. शाळा खानापूर येथे आहे. या शाळेत पहिली ते सातवीपर्यंत वर्ग असून पहिली ते चौथीपर्यंत प्रत्येकी दोन वर्ग आहेत. शाळेचा पट ३४३ आहे. शाळेत आवश्यक शिक्षकांची संख्या बारा आहे. मात्र उपलब्ध शिक्षक नऊ आहेत. शाळेचे मुख्याध्यापक पद गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहे. एकूण चार जागा रिक्त आहेत. त्यामुळे दोन वर्ग एकत्र बसवून अध्यापन सुरू आहे.
पळशी केंद्रात तब्बल बारा जागा रिक्त आहेत. केंद्रातील बाणूरगड, पडळकर वस्ती, ताडाचीवाडी, पुजारमळा, खापरगादे, पळशी येथे प्रत्येकी एक जागा रिक्त आहे, तर कुसबावडे, करंजे, विठ्ठलनगर येथे प्रत्येकी दोन जागा रिक्त आहेत. कुसबावडे, विठ्ठलनगर या दोन्ही शाळा दोनशिक्षकी आहेत व ही दोन्ही पदे रिक्त राहिल्याने या शाळांची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’ अशी झाली आहे.
रेणावी केंद्रामधील जाधववाडी शाळेत दोन, तर रेवणगावमध्ये एक जागा रिक्त आहे. याशिवाय तालुक्यात केंद्र प्रमुखाच्या चार जागा रिक्त आहेत. मुख्याध्यापकांच्या चार जागा रिक्त आहेत. त्यामुळे तालुक्याची शैक्षणिक प्रगती यापुढे कायम राहणार, का थांबणार? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.


कोण काय म्हणाले?

खानापूर तालुक्यामधील रिक्त प्राथमिक शिक्षक पदांच्याबाबत वरिष्ठांकडे वेळोवेळी माहिती देऊन रिक्त पदे त्वरित भरण्यासंबंधी मागणी केली आहे. जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आठवडाभरात सर्व पदे भरण्यात येतील, असे सांगितले आहे. शिक्षक उपलब्ध होताच सर्व रिक्त जागा भरल्या जातील. काही दिवसांमध्ये ही अडचण दूर होईल. यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत.
- अनिस नायकवडी, गटशिक्षणाधिकारी

गतवर्षी ‘स्वच्छ, सुंदर शाळा, आदर्श शाळा’ आदी पुरस्कार खानापूर गटातील जि. प. शाळांना मिळाले आहेत. सर्वाधिक लोकवर्गणी खानापूर गटातील शाळांना मिळाली आहे. गुणवत्ता वाढीतही शाळा अग्रेसर आहेत. मात्र जि. प.च्या शिक्षण विभागाने कौतुक करण्याऐवजी खानापूर गटातील शाळांना रिक्त पदांचे बक्षीस देऊन फार मोठा अन्याय केला आहे. वारंवार लेखी, तोंडी मागणी करूनही शिक्षणाधिकाऱ्यांनी अद्याप दखल घेतलेली नाही.
- सुहास नाना शिंदे,
जि. प. सदस्य.

खानापूर गटातील शाळा दर्जेदार आहेत. सर्व शाळा प्रगतीपथावर आहेत. इंग्रजी माध्यमाचे वारे असतानाही जि. प. शाळा पट टिकवून गुणवत्ता वाढीत आघाडीवर आहेत. अशा स्थितीत शिक्षकांची पदे रिक्त ठेवणे अन्यायकारक आहे. सर्व रिक्त पदे त्वरित भरावीत, अशी मागणी केली आहे. याचा शिक्षण विभाग गांभीर्याने विचार करून निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.
- यशवंत तोडकर,
माजी सरपंच, खानापूर

Web Title: Teacher's vacancy: 19 out of 20 seats are available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.