चिकुर्डेतील यशवंत आश्रमशाळेच्या शिक्षकांचे वाडीवस्त्यांवर जाऊन अध्यापन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:27 AM2021-01-23T04:27:00+5:302021-01-23T04:27:00+5:30
ऐतवडे बुद्रुक : जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपक्रम राबवण्यात आले. ऑनलाईन शिक्षणावर ...
ऐतवडे बुद्रुक : जागतिक महामारीच्या काळात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून अनेक उपक्रम राबवण्यात आले. ऑनलाईन शिक्षणावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. मात्र, सर्वांनाच ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही. या अडचणींची दखल घेऊन चिकुर्डे (ता. वाळवा) येथील यशवंत आश्रम प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गोरक्ष सावंत व त्यांच्या शिक्षक सहकाऱ्यांनी वाडी वस्ती, गल्ली, दलित वस्ती व घरोघरी जाऊन समूह अध्यापन सुरू केले आहे. सध्या या योजनेमुळे शाळेतील जवळपास सर्वच गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाचा लाभ मिळत आहे.
आश्रमशाळेतील बहुतांश विद्यार्थी दीनदलित, शोषित - पीडित, वंचित, कष्टकरी, ऊसतोड कामगार व रोजंदारी करणाऱ्या पालकांची मुले आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी टीव्ही, लॅपटॉप, अँड्रॉइड मोबाईल यांची तर त्यांच्याकडे वानवाच. मग ही मुले शिकली पाहिजेत, सर्वांना शिक्षणाचा समान अधिकार आहे व त्यांना मिळालाच पाहिजे. या उदात्त हेतूने या कल्पक उपक्रमास खऱ्या अर्थाने सुरुवात करण्यात आली. शाळेची पटसंख्या ३६० असून, निवासी १२०, तर अनिवासी २४० विद्यार्थी शाळेत आहेत. सर्व शिक्षकांनी मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन अध्यापन सुरू केले. सुरुवातीस या उपक्रमात पालकांचाही कमी प्रतिसाद लाभला. मात्र, सध्या पालकांकडून या उपक्रमास भरघोस प्रतिसाद मिळत आहे.
चौकट
शाळेतील बहुसंख्य विद्यार्थी हे अत्यंत गरीब व कष्टकरी समाजातील आहेत. त्यामुळे त्यांना अँड्रॉइड मोबाईल किंवा लॅपटॉपद्वारे शिक्षण घेण्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. त्यामुळे त्यांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून आम्ही शिक्षकांच्या सहकार्याने समूह अध्यापन सुरू केले आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण मिळत असून, एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी घेऊ.
- गोरक्ष सावंत, मुख्याध्यापक,
यशवंत प्राथमिक आश्रमशाळा, चिकुर्डे.