रिलायन्स ज्वेल्स दरोड्याच्या तपासासाठी देशभर पथके रवाना; चार महिन्यातील चौथा दरोडा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 7, 2023 05:27 AM2023-06-07T05:27:24+5:302023-06-07T05:28:14+5:30
चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क, सांगली : रिलायन्स ज्वेल्स या सराफी पेढीवर गेल्या चार महिन्यात देशातील विविध शहरात चार दरोडे टाकण्यात आल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या चारही दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे. त्यामुळे या दरोड्यामागे मोठी टोळी कार्यरत असल्याची शक्यता आहे. सांगली पोलिसांची आठ पथके बिहार, राजस्थान, उत्तरप्रदेशासह नेपाळकडेही रवाना झाली आहे. दरम्यान, चोरीतील सोने विदेशात जाण्याची भीतीही पोलिसांनी व्यक्त केली.
वसंतदादा मार्केट यार्डाजवळील रिलायन्स ज्वेल्समधून रविवारी भरदिवसा दरोडेखोरांनी अंदाजे २२ किलो वजनाचे १४ कोटी रुपयांचे सोने, चांदी आणि हिऱ्याचे दागिने लुटले. या दरोड्यात वापरलेली मोटार भोसे (ता. मिरज) येथील शेतात मिळून आली. तर एक दुचाकी मिरज बायपास रस्त्याला सापडली. माेटारीत चोरट्यांचे कपडे, बॅग व दाेन पिस्तुले पोलिसांना सापडली.
गेल्या फेब्रुवारीपासून आतापर्यंत देशभरात चार ठिकाणी रिलायन्स ज्वेल्सवर दरोडा पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. दिल्ली, पश्चिम बंगाल आणि ओडीसा या ठिकाणी पडलेल्या दरोडा आणि सांगलीतील दरोड्याची पद्धत जवळपास एकच आहे. दिल्लीतील दरोड्यात तिघांना अटक झाली आहे. पण त्यांच्याकडून सुत्रधाराबाबत फारशी माहिती मिळाली नाही. सांगलीत पडलेला दरोडा चौथा आहे.
दुकानाबाहेर तीन ते चार फेऱ्या
दरोडेखोरांनी आधीच रिलायन्स ज्वेल्सची रेकी केली होती. त्यांचे काही साथीदार सकाळपासून दुकानाबाहेर होते, तर दरोडे टाकणारे शहरात फिरत होते. शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दरोडेखोरांची मोटार फिरत असल्याचे दिसून येते. दुपारी मार्केट यार्ड ते टाटा पेट्रोलपंपपर्यंतचा रस्ता बंद करण्यात आला. हीच वेळ साधत दरोडेखोर दुकानात शिरल्याची माहिती मिळत आहे.
दुकानाबाहेर गोळीबार
- रिलायन्स ज्वेल्स दुकानात दरोडेखोर शिरले होते. कर्मचाऱ्यांना एका ठिकाणी करीत त्यांना चिकटपट्टीने बांधण्यात येत होते.
- काही साथीदार दुकानाबाहेर रस्त्यावर होते. याचवेळी एक ग्राहक दुकानात आला. त्याने काचेतून दरोड्याचा प्रकार पाहिला.
- तो आरडाओरडा करू लागताच रस्त्यावर उभे असलेल्या साथीदारांनी ग्राहकाच्या दिशेने गोळीबार केला. यातच दुकानाच्या प्रवेशद्वाराची काच फुटल्याचे तपासात समोर आले आहे.