सांगली जिल्हा कारागृहातून पळालेल्या संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना, कर्मचाऱ्यांची चौकशी?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2022 03:36 PM2022-08-02T15:36:50+5:302022-08-02T15:37:16+5:30
कारागृहाच्या शेतातील कचरा फेकण्याचा बहाणा करून त्याने तटबंदीवरून उडी मारून पळ काढला.
सांगली : जिल्हा कारागृहातून पळून गेलेला संशयित सुनील ज्ञानेश्वर राठोड (रा. येळगोड, ता. सिंदगी, जि. विजापूर) याच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. सांगली, कोल्हापूरसह कर्नाटकात शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सुनील राठोड हा जेसीबी मालक हरी येडुपल पाटील (रा. मंगसुळी) यांच्याकडे चालक म्हणून काम करत होता. मालक हरी पाटील यांनी सुनीलची पत्नी पार्वती हिच्या अंगावर हात टाकला होता. त्यामुळे चिडून जाऊन सुनील आणि त्याच्या पत्नीने ८ जून २०२१ रोजी जेसीबी मालक हरी पाटील याचा निर्घृण खून केला. पाटील याचा मृतदेह प्लास्टिक पिशवीत घालून तो विहिरीत टाकला. या प्रकरणांचा तपास तत्कालीन स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाने सुनील आणि त्याची पत्नी पार्वती या दोघांना पुणे हद्दीतून अटक केली होती.
सुनील हा सांगली कारागृहात होता. रविवारी सकाळी कारागृहाच्या शेतातील कचरा फेकण्याचा बहाणा करून त्याने तटबंदीवरून उडी मारून पळ काढला. पोलिसांनी तातडीने नाकाबंदी केली. सांगली शहर, एलसीबीचे पथकाकडून त्याचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रासह कर्नाटकातही छापे टाकले जात आहे. लवकरच तो पोलिसांच्या तावडीत सापडेल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला.
कारागृह कर्मचाऱ्यांची चौकशी
कारागृहातून कैदी पळाल्याने प्रशासन हादरले आहे. राठोड पळून गेला तेव्हा ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांची खात्यांतर्गत चौकशी हाती घेण्यात आल्याचे समजते.