तंत्रज्ञानाचा ज्येष्ठांना लसीकरणासाठी अडसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:29+5:302021-03-05T04:27:29+5:30
पलूस : ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू असले तरी ऑनलाइन प्रणालीमुळे संभ्रम आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिका याची माहिती नसल्याने ...
पलूस : ज्येष्ठ नागरिकांसाठी कोरोना लसीकरण सुरू असले तरी ऑनलाइन प्रणालीमुळे संभ्रम आहे. बहुतांश ज्येष्ठ नागरिका याची माहिती नसल्याने या ऑनलाइन प्रक्रियेपासून दूर पळत आहेत. यामुळे जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण करण्याच्या ध्येयापासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.
शासनाने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचे कोरोनाबाबत लसीकरण सुरू केले. तसे आदेश ग्रामीण रुग्णालयांना दिले; परंतु त्यांची नोंदणी ऑनलाइन करणे आवश्यक ठेवल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. कारण बहुतांश ज्येष्ठ नागरिक हे मोबाइल ॲप किंवा ऑनलाइन प्रक्रियेशी अनभिज्ञ आहेत. या ॲपमध्ये आपला मोबाइल नंबर, आधार कार्ड, काही त्रास होत असेल तर त्याबाबत माहिती अशी बरीच माहिती भरल्यानंतर त्यांनी नोंदवलेल्या क्रमांकावरती पासवर्ड येतो आणि मग त्यांचा लसीकरणासाठी प्रतीक्षा यादीत नाव समाविष्ट होते.
खरं तर ही सगळी कार्यपद्धती किचकट आणि वेळखाऊ आहे. पलूस तालुक्यात ग्रामीण रुग्णालयात आजअखेर पोलीस, अंगणवाडीसेविका, आरोग्य सेवक आणि ज्येष्ठ नागरिक अशी १२०० नागरिकांचे लसीकरण झाले आहे; परंतु तालुक्यात साधारण १७ हजार नुसत्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे आणि यासाठी फक्त ग्रामीण रुग्णालयावर लसीकरणाचा भर न टाकता भिलवडी आणि कुंडल प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ही लसीकरण सोय करणे गरजेचे आहे.
कोट
ज्या ४५ ते ५९ वयातील नागरिकांना व्याधी आहे अशांनी तसे प्रमाणपत्र घेऊन आले तर त्यांना जागेवर लसीकरण केले जाईल तसेच जे ६० वर्षांवरील नागरिक आहेत त्यांनी आपले आधार कार्ड घेऊन ग्रामीण रुग्णालयात जाऊन लसीकरण करावे.
- मिलिंद पोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, सांगली.
चौकट
बहुतांश ज्येष्ठ नागरिक तंत्रज्ञानाबाबत अनभिज्ञ आहेत. त्यांना ही प्रणाली किचकट वाटते. यासाठी लेखी नोंदणी करून लसीकरण करणे आवश्यक आहे.
-डॉ. व्ही.डी. पाटील, अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक संघ.