संख लाचप्रकरणी तहसीलदारांचे निवासस्थान सील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:19 AM2021-06-24T04:19:15+5:302021-06-24T04:19:15+5:30
संख : संख (ता. जत) येथे मातीची वाहने सोडण्यासाठी तलाठी विशाल उदगिरी याला २ लाख ३० हजार रुपयांंची लाच ...
संख : संख (ता. जत) येथे मातीची वाहने सोडण्यासाठी तलाठी विशाल उदगिरी याला २ लाख ३० हजार रुपयांंची लाच घेताना लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले असून, अपर तहसीलदार हणमंत मेत्री याच्या सांगण्यावरून त्याने लाच घेतल्याचे उघड झाले आहे. त्यातून अपर तहसील कार्यालयाच्या गैरकारभाराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तहसीलदारांचे निवासस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केले आहे.
संख येथे २६ जानेवारी २०१८ रोजी तहसील कार्यालय सुरू झाले. यामध्ये ५८ गावांचा समावेश आहे. सप्टेंबर २०२०ला हणमंत मैत्री यांनी अपर तहसीलदारपदाचा कार्यभार स्वीकारला. सुरुवातीस त्यांनी वाळू कारवाईचा धडाका लावला. दरारा निर्माण करून वाहने सोडवण्यासाठी चिरमिरी वसुली सुरू झाली. वसुलीसाठी मर्जीतील कर्मचाऱ्यांची नेमणूक केली.
त्यामध्ये तलाठी विशाल उदगिरी होता.
वाळू, मुरुमाची वाहने जप्त करून मंडलातील आवारात लावली जात होती. ती नोंद न करता परस्पर सोडली जात होती. वाहने सोडण्यासाठी लाखो रुपये घेतले जात होते.
संखमध्ये विशाल उदगिरी तलाठी असताना मध्यम प्रकल्पात वाळू तस्करी सुरू होती. दुचाकी, चारचाकी गाड्या, जमिनींची स्थावर मालमत्ता हा त्याच्या कमाईचा प्रवास थक्क करणारा आहे. अपर तहसीलदार कार्यालय एजंटगिरीचे स्थान बनले आहे, हे सिद्ध झाले आहे.
सध्या तहसीलदारांचे निवासस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केले आहे. बंगल्यासमोर शासकीय गाडी उभी आहे. छापा पडल्यानंतर बुधवारी तहसील कार्यालयामध्ये शुकशुकाट होता.
लाचखोर अपर तहसीलदार हणमंत म्हेत्रे सांगली लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयामध्ये दुपारी एक वाजता स्वतःहून हजर झाला.
चौकट
दुसरी घटना
तत्कालीन अपर तहसीलदार नागेश गायकवाड यांची बदली झाल्यावर लिपिक सदाशिव बिराजदार याने ८५ वाटपपत्रे बनावट सही करून दिली होती. त्यामध्ये त्याला निलंबित करण्यात आले होते. आता हे दुसरे प्रकरण बाहेर आले आहे.
चौकट
शिक्षक ते तहसीलदार
लाचखोर तहसीलदार हणमंत मेत्री याने शिक्षक म्हणून नोकरी केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षेतून त्याची महसूल विभागात नायब तहसीलदारपदी निवड झाली. विटा तहसील कार्यालयातून संख अपर तहसीलदार म्हणून आठ महिन्यांपूर्वी तो रूजू झाला होता.
फोटो ओळ :
१) संख अपर तहसीलदार हणमंत मेत्री याचे निवासस्थान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सील केले.
२) संख (ता जत) येथील अपर तहसीलदार कार्यालयात बुधवारी शुकशुकाट होता.