शेटफळेत बंदिस्त पाइपलाइनमधून टेंभूचे पाणी दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:44 AM2021-05-05T04:44:25+5:302021-05-05T04:44:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथील शिवारात टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे पाणी दाखल झाले असून प्रथम ...
लोकमत न्यूज नेटवर्क
करगणी : शेटफळे (ता. आटपाडी) येथील शिवारात टेंभू योजनेच्या बंदिस्त पाइपलाइनचे पाणी दाखल झाले असून प्रथम चाचणी यशस्वीपणे पार पडली आहे. शिवसेनेचे नेते तानाजी पाटील यांच्या हस्ते पाणी पूजन करून शेटफळे व लेंगरेवाडीतील ग्रामस्थांनी आनंद सोहळा साजरा केला.
पाणी संघर्ष परिषदेच्या माध्यमातून दिवंगत नागनाथअण्णा नायकवडी यांच्यापासून सर्वच राजकीय नेत्यांनी आपापल्यापरीने दुष्काळी आटपाडी तालुक्याच्या शेतात पाणी येण्यासाठी प्रयत्न केले आहेत.
याचीच फलश्रुती म्हणून बंदिस्त पाइपलाइनचा मार्ग शासनाने स्वीकारत तो पूर्णत्वाकडे नेण्याचे काम सुरू आहे.
शेटफळे ते लेंगरेवाडी गावातील अनेक ठिकाणी बंदिस्त पाइपलाइनच्या पाण्याची चाचणी घेण्यात आली. पूर्ण क्षमतेने चाचणी यशस्वी झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.
या वेळी तानाजी पाटील म्हणाले की, आमदार अनिल बाबर यांनी शेतकऱ्यांना लवकरच टेंभूचे पाणी दिसेल, असा शब्द दिला होता. तो पूर्णत्वास येऊ लागल्याची खात्री वाटत आहे. प्रत्यक्षात शेतात लवकरच पाणी दिसेल.
या वेळी शेटफळेचे उपसरपंच निवृत्ती गायकवाड, युवा नेते सोमनाथ गायकवाड, विजय देवकर, विलास गायकवाड, चंद्रकांत गायकवाड, नागेश गायकवाड, लेंगरेवाडीचे बजरंग लेंगरे उपस्थित होते.