टेंभू, ताकारीसह विस्तारित म्हैसाळही सौर ऊर्जेवर येणार; माजी खासदार संजय पाटील यांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2024 04:45 PM2024-07-03T16:45:11+5:302024-07-03T16:45:33+5:30
म्हैसाळ सौर ऊर्जेचे तीन महिन्यांत काम सुरू होणार
सांगली : म्हैसाळ योजनेतील सौर ऊर्जा प्रकल्पासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात एक हजार ५९४ कोटींची तरतूद केली आहे. येणाऱ्या तीन महिन्यांत सौर ऊर्जेच्या कामाला सुरुवात होणार आहे. म्हैसाळनंतर टेंभू, ताकारी आणि विस्तारित म्हैसाळ योजनाही सौर ऊर्जेवर येणार आहेत, अशी माहिती माजी खासदार संजय पाटील यांनी सांगलीत मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
संजय पाटील म्हणाले, म्हैसाळ पथदर्शी उपक्रम राबविण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मान्यता दिली. देशातील सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालणारा पहिला प्रकल्प आहे.टप्प्याटप्प्याने टेंभू आणि ताकारी, आरफळ योजनादेखील सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार आहे. म्हैसाळ योजना सौर ऊर्जेवर आल्यामुळे मिरज, कवठेमहांकाळ, जत आणि सांगोला, मंगळवेढा तालुक्यांतील शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
सिंचन योजना चालवताना शेतकऱ्यांवर वीज बिलाचा बोजा जास्त असतो. योजना चालवताना अडचणी येतात, म्हैसाळ योजनेचे सुमारे ५० ते ५५ कोटी रुपयांचे बिल येत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी आता सौर ऊर्जेच्या प्रकल्पाची मागणी केली होती. त्याला मान्यता मिळून राज्य शासनाच्या अर्थसंकल्पात यासाठी मान्यता दिली आहे. जर्मन बँक ७० टक्के आणि राज्य सरकार ३० टक्के निधी देणार आहे.
म्हैसाळ योजनेच्या सौर ऊर्जा प्रकल्पास एक हजार ५९४ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. सौर ऊर्जेमुळे वीज बिल थकबाकीचा प्रश्न सुटणार आहे. जत तालुक्यातील संख येथे २०० हेक्टरवर होणार प्रकल्प होणार आहे. २०० मेगावॅट वीजनिर्मिती प्रकल्प होणार आहे. सर्व प्राथमिक सर्वेक्षण, तपासण्या केल्या आहेत. त्यामुळे तीन महिन्यांत काम सुरू होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
प्रथमच ४० टीएमसी पाणी उचलले
जिल्ह्यातील दुष्काळी भागात यावर्षी उन्हाळ्यात आपण आजपर्यंत कधीच मिळाले नाही, इतके पाणी सोडले. टेंभू, ताकारी आणि म्हैसाळ योजनांच्या माध्यमातून इतिहासात प्रथमच ४० टीएमसी पाणी मिळालेे. उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोयनेच्या वीजनिर्मितीसाठी लागणारे ८ टीएमसी अतिरिक्त पाणी सांगली जिल्ह्याला दिले आहे, असा दावाही संजय पाटील यांनी केला.