मंदिरे बंद, मात्र दरवाजावर गणेश भक्तांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:47 AM2021-03-04T04:47:53+5:302021-03-04T04:47:53+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळावा म्हणून जिल्ह्यातील सर्व गणेश मंदिरे अंगारकी संकष्टीला बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा संसर्ग टाळावा म्हणून जिल्ह्यातील सर्व गणेश मंदिरे अंगारकी संकष्टीला बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला होता. आदेशाचे पालन मंदिरांनी केले, मात्र भाविकांनी देवाच्या दर्शनासाठी दारावरच गर्दी केली.
पहाटेपासूनच सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिराबाहेर भाविक दर्शनासाठी येऊ लागले होते. सकाळी नऊनंतर गर्दी वाढत गेली. दुपारी दीड वाजेपर्यंत गर्दी कायम होती. गणपती मंदिरापासून सराफ कट्ट्यापर्यंत वाहनांची मोठी गर्दी झाली होती. प्रत्येक संकष्टीला जसे मंदिर परिसराला जत्रेचे स्वरूप प्राप्त होते, तसेच चित्र मंगळवारी अंगारकीला दिसून आले. फरक फक्त मंदिराच्या बंद दरवाजाचा होता. रस्त्यावर उभे राहून मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर डोके ठेवून भाविकांनी गणरायाला वंदन केले. दुर्वा, अगरबत्ती व अन्य साहित्य मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ भाविक ठेवत होते. सायंकाळी सहानंतरही गर्दी वाढली. रात्री आठपर्यंत ती कायम होती. सांगलीच्या विश्रामबाग गणपती मंदिराजवळही भाविकांनी बाहेरून दर्शन घेतले. हरिपूरच्या बागेतील गणपती मंदिरांतूनही बाहेरून दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी होती.
पोलीस बंदोबस्त
मंदिर परिसरात पोलिसांचा बंदोबस्त सकाळपासून होता. गर्दी नियंत्रणात राहावी म्हणून पोलिसांनी प्रयत्न केले. सांगलीच्या पंचायतन गणपती मंदिराबाहेरील गर्दी नियंत्रणात आणताना मात्र पोलिसांची दमछाक झाली. भाविकांना समजावून सांगूनही ते गर्दी करत होते.
वाहतुकीची कोंडी
मंदिराबाहेरून दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक आल्यामुळे सकाळी व सायंकाळी गणपती पेठ, टिळक चौक ते गणपती मंदिर याठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. वाहतूक पोलिसांचीही त्यामुळे कसरत झाली.
पहिलीच संकष्टी
२०२० मध्ये एकही अंगारकी संकष्टी नव्हती. २०२१ मधील ही पहिलीच अंगारकी असल्याने भाविकांनी दर्शनासाठी मंदिरांबाहेर गर्दी केली होती.