‘टेंभू’च्या गैरव्यवस्थापनाने ‘ताकारी’ बंद

By admin | Published: April 19, 2016 12:06 AM2016-04-19T00:06:30+5:302016-04-19T00:56:17+5:30

गरजेपेक्षा जादा पाणीसाठा : ‘ताकारी’ची पाणी पातळी खालावली

'Temporary' closure of 'Tembhu' mismanaged | ‘टेंभू’च्या गैरव्यवस्थापनाने ‘ताकारी’ बंद

‘टेंभू’च्या गैरव्यवस्थापनाने ‘ताकारी’ बंद

Next

प्रताप महाडिक--कडेगाव -टेंभू उपसा सिंचन प्रकल्प योजनेच्या अधिकाऱ्यांच्या गैरव्यवस्थापनामुळे ताकारी योजना अचानक बंद झाली. चालूवर्षी सलग तिसऱ्या आवर्तनालाही असा प्रकार घडल्यामुळे ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कऱ्हाड तालुक्यातील टेंभू येथील पाणी साठवण बंधाऱ्यात गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून टेंभूच्या अधिकाऱ्यांनी पाणी अडवून ठेवले आहे. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणी पातळी खालावली आहे. यामुळे ताकारी उपसा सिंचन योजना अचानकपणे रविवारी सायंकाळी पाच वाजता बंद पडली.ताकारी व टेंभू या दोन्ही सिंचन योजनांसाठी कोयना धरणातून पाणी सोडले जाते. ताकारी तसेच टेंभू योजना आणि कृष्णा नदीवरील अन्य सर्व पाणी वितरण व व्यवस्थापनाचे अधिकार सांगली पाटबंधारे विभागाकडे दिले आहेत. ताकारी व टेंभू या दोन्ही योजना आवर्तनासाठी आवश्यक पाणी मागणी सांगली पाटबंधारे विभागाकडे करतात. योजनांच्या मागणीप्रमाणे सांगली विभागाकडून कोयना धरणातून पाणी सोडले जाते. सोडलेले पाणी प्रथम टेंभू योजनेच्या टेंभू (ता. कऱ्हाड) येथील पाणी साठवण बंधाऱ्यात जाते. टेंभू बंधाऱ्यात गरजेप्रमाणे आवश्यक पाणी पातळी ठेवून ताकारी तसेच कृष्णा नदीवरील अन्य उपशासाठी जादा आलेले पाणी टेंभूच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या साठवण बंधाऱ्याचे दरवाजे उघडून पुढे सोडणे गरजेचे आहे. तशा सूचना सांगली पाटबंधारे विभागाचे अधिकारी जबाबदारीने देतात.
यामुळे ताकारी योजनेसाठी आवश्यक पाणीसाठा या योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्यात होतो. परंतु सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनांचे पालन न करता टेंभू योजनेचे अधिकारी आवश्यकतेपेक्षा जादा पाणी अडवून ठेवतात. यामुळे ताकारी योजनेला आवश्यक असणारी ५४० ते ५४१ मीटर पाणी पातळी साटपेवाडी बंधाऱ्यात मिळत नाही. काल, रविवारी सायंकाळी पाच वाजता ताकारी योजनेची पाणी पातळी खालावली आणि योजना बंद पडली. मागील दोन्ही आर्वतनातही अशाप्रकारे ताकारी योजना बंद पडली, याला टेंभूचे गैरव्यवस्थापनच कारणीभूत आहे.
ताकारी योजनेचे आवर्तन सुरू होऊन महिना झाला. ताकारीचे पाणी १०० किलोमीटरवर तासगाव तालुक्यातील विसापूरच्या जवळपास पोहोचले होते. आता योजना अचानक बंद झाली. मुख्य कालवा कोरडा पडला आहे.
आता पुन्हा योजना सुरू करून १०० किलोमीटरपर्यंत पाणी जाण्यासाठी किमान दोन दिवस लागतील.
या दोन्ही दिवसातील पाण्याचा अपव्यय आणि वीज बिलाचा भुर्दंड ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनाच सोसावा लागणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाच्या सूचनेनुसार कार्यवाही न करणाऱ्या टेंभूच्या संबंधित अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई होणे गरजेचे आहे, अशी मागणी ताकारी योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी वर्गातून होत आहे.
ताकारी-म्हैसाळ सिंचन व्यवस्थापन विभागामार्फत ताकारीची आवर्तने नियमित मिळत असताना आणि पाणीपट्टी वसुली चांगली असताना असे कृत्रिम अडथळे निर्माण होत असल्यामुळे योजनेच्या लाभक्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

अधिकारी बेजबाबदार : कारवाईची मागणी
ऐन दुष्काळात जबाबदारीचे भान ठेवून टेंभूचे अधिकारी काम करीत नाहीत. सांगली विभागाच्या सूचनेप्रमाणे कार्यवाही करीत नाहीत. गरजेपेक्षा जादा पाणीसाठा करून ठेवत आहेत. यामुळे ताकारी योजनेच्या साटपेवाडी बंधाऱ्याची पाणीपातळी खालावली आणि ताकारी योजना बंद पडली. ही घटना सलग तीन आर्वतनात घडली. याप्रकरणी चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

Web Title: 'Temporary' closure of 'Tembhu' mismanaged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.