सांगली जिल्ह्यातील ३१ हजार रहिवासी आणि ९ हजार जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवले, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:25 PM2019-08-06T14:25:54+5:302019-08-06T14:48:24+5:30
नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये
सांगली - सांगली जिल्ह्यात अतिवृष्टी होत असून यामुळे 6 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजेपर्यंत जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 526 कुटुंबांतील 31 हजार 782 लोक व 9 हजार 728 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात पुनर्वसन करण्यात आले आहे. यामध्ये प्रशासकीय शिबिरामध्ये 3 हजार 981 कुटुंबांतील 17 हजार 719 लोक व 4 हजार 648 जनावरे यांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. तर नातेवाईक व सोयीनुसार 2 हजार 545 कुटुंबांतील 14 हजार 64 लोक व 5 हजार 80 जनावरांचे तात्पुरते पुनर्वसन केले आहे. पूरपरिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन अत्यंत गांभीर्याने प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेला प्रशासनाने सर्वोच्च प्राधान्य दिले असून नागरिकांनी घाबरून जावू नये, अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.
यामध्ये वाळवा तालुक्यातून 28 गावातील 1 हजार 480 कुटुंबांतील 6 हजार 441 लोक तर 2 हजार 986 जनावरे विस्थापित झाले असून त्यांचे विविध सुरक्षित ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. शिराळा तालुक्यातील 14 गावातील 106 कुटुंबांतील 489 लोक विस्थापित झाले आहेत. तर 1 हजार 306 जनावरे विस्थापित झाली आहेत. त्यांचे नातेवाईक व गावातील उंच ठिकाणी तात्पुरते पुनर्वसन करण्यात आले आहे. पलूस तालुक्यातील 21 गावातील 1 हजार 958 कुटुंबांतील 8 हजार 2 लोक विस्थापित झाले असून तर 2 हजार 293 जनावरे विस्थापित झाली आहेत. त्यांचे सुरक्षित ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे. मिरज तालुक्यातील 17 गावातील 2 हजार 150 कुटुंबांतील 12 हजार 848 लोक व 2 हजार 896 जनावरे विस्थापित झाली आहेत. तर सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील 832 कुटुंबांतील 4 हजार 2 व्यक्ती व 247 जनावरे विस्थापित झाली आहेत. एकूण जिल्ह्यातील सुमारे 6 हजार 526 कुटुंबांतील 31 हजार 782 लोक व 9 हजार 728 जनावरे यांचे तात्पुरत्या स्वरूपात, नातेवाईक, गावातील उंच ठिकाणी, शाळा, समाज मंदिरे या ठिकाणी पुनर्वसन करण्यात आले आहे.
सांगली जिल्हा स्तरावर नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. सध्या हा कक्ष २४ तास सुरू आहे. त्याचा संपर्क क्रमांक ०२३३२६००५०० किंवा टोल फ्री क्रमांक १०७७ वर संपर्क साधता येईल. जिल्ह्यात पडणारा पाऊस व इतर अनुषंगिक माहिती या ठिकाणी उपलब्ध होऊ शकते. त्याशिवाय पोलीस नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २६७२१००), पाटबंधारे नियंत्रण कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३०१८२०) आणि महानगरपालिका कक्ष (संपर्क क्रमांक ०२३३ २३७३३३३) या ठिकाणी नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. कोणत्याही पध्दतीने मदतीची आवश्यकता असल्यास या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहनही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.