शॉर्टसर्किटने टेम्पोला आग

By admin | Published: October 17, 2016 12:35 AM2016-10-17T00:35:28+5:302016-10-17T00:35:28+5:30

विटा येथे दुर्घटना : तीन ते चार लाखांची हानी; टेम्पोसह कांद्याचे नुकसान

Temporola fire on the short circuit | शॉर्टसर्किटने टेम्पोला आग

शॉर्टसर्किटने टेम्पोला आग

Next

विटा : घोडेगाव (जि. अहमदनगर) येथून इचलकरंजी बाजारपेठेत कांदा घेऊन निघालेल्या मालवाहू टेम्पोला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाले. या आगीत टेम्पोची केबिन पूर्णपणे जळून खाक झाली, तर कांद्याचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना रविवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास विटा शहरापासून तीन किलोमीटरजवळ तासगाव रस्त्यावरील गांधीनगर येथे घडली.
पारनेर (जि. अहमदनगर) येथील पंडित मोहन म्हेत्रे यांच्या मालकीचा टेम्पो (क्र. एमएच १६, एवाय २०७०) चालक विजय विष्णू गाडे (रा. पारनेर) घेऊन इचलकरंजीकडे चालला होता. या टेम्पोत कांदा भरण्यात आला होता. टेम्पो विटा-तासगाव रस्त्यावरील गांधीनगर फाट्याजवळ आला असता, बॉनेटमधून अचानक धूर येऊ लागल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्यावेळी चालकाने टेम्पो रस्त्याच्या बाजूला घेऊन तो खाली उतरला. तेवढ्यात टेम्पोच्या केबिनने पेट घेतला. टेम्पोपासून जवळच काही अंतरावर पेट्रोल पंप असल्याने प्रचंड घबराट निर्माण झाली.
विटा-तासगाव या प्रमुख मार्गावर ही घटना घडल्याने वाहनधारकांची प्रचंड धावपळ उडाली. या घटनेची माहिती विटा पोलिस व नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला मिळताच अग्निशमन गाडी तातडीने घटनास्थळी दाखल झाली. विटा पोलिसांनी या रस्त्यावरील दोन्ही बाजूची वाहतूक बंद केल्याने सुमारे दोन ते अडीच तास वाहतूक ठप्प झाली होती. तासाभराच्या प्रयत्नानंतर अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझविली. या आगीत टेम्पोचे पुढील दोन टायर, इंजिन, केबीन आणि छतावरील ताडपदरी पूर्णपणे जळून खाक झाली. टेम्पोतील कांद्याला उष्णता लागल्याने आणि आग विझविताना कांद्यात पाणी गेल्याने कांदाही खराब झाला. या घटनेत सुमारे ३ ते ४ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. (वार्ताहर)
 

Web Title: Temporola fire on the short circuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.