सांगली बाजार समितीचे दहा माजी संचालक अपात्रच
By अशोक डोंबाळे | Published: April 17, 2023 06:14 PM2023-04-17T18:14:24+5:302023-04-17T18:14:48+5:30
पणन संचालकांचा दणका : प्रवास भत्त्यासह जमीन खरेदीतील घोटाळ्याचा ठपका: बाजार समितीच्या निवडणूकीतून दिग्गज पडले बाहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली बाजार समितीच्या निवडणुकीत दहा माजी संचालकांचे उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मंगेश सुरवसे यांनी अपात्र ठरविले आहेत. या निर्णयाविरोधात सर्वांनी पणन संचालकांकडे धाव घेत होती. पणन सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी जिल्हा उपनिबंधकांचा निर्णय कायम ठेवत सर्व दहा संचालकांना अपात्र केले आहे. दरम्यान, अपात्रतेच्या निर्णयामुळे बाजार समितीच्या निवडणुकीतून दिग्गज बाहेर पडल्याने राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील गटाला धक्का बसला आहे.
सांगली बाजार समितीच्या १८ जागांसाठी विक्रमी ५९८ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. त्यांची छाननी मिरजेत उपनिबंधक सुरवसे यांच्या उपस्थितीत झाली होती. अनिल शेगुणसे यांनी दहा माजी संचालकांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतला. जमिन खरेदी, जागा भाड्याने देण्यामध्ये माजी संचालकांनी गैरव्यवहार केला असून, त्यांची चौकशी सुरू आहे. यामुळे संतोष पाटील, प्रशांत शेजाळ, वसंत गायकवाड, दीपक शिंदे, अण्णासाहेब कोरे, अभिजित चव्हाण, मुजीर जांभळीकर, बाळासाहेब बंडगर आणि अजित बनसोडे आदी दहा माजी संचालकांचे अर्ज अवैध करण्याची मागणी केली होती. तक्रारीनुसार जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांनी दहा माजी संचालकांचे अर्ज अवैध केले होते.
जिल्हा उपनिबंधकांच्या निर्णयाविरोधात सर्व अपात्र संचालकांनी पणन संचालकांकडे धाव घेतली होती. पणन सहसंचालक मोहन निंबाळकर यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. निंबाळकर यांनी सोमवारी दोन्ही बाजू समजून घेऊन जिल्हा उपनिबंधक सुरवसे यांचा निर्णय कायम ठेवला आहे. सांगली बाजार समितीच्या सर्व दहा माजी संचालकांना अपात्र ठरविले आहे, अशी माहिती सहसंचालक मोहन निंबाळकर यांनी दिली.