दहा तासांनंतर औंधच्या हत्तीचं मथुरेकडे प्रस्थान
By admin | Published: June 14, 2017 11:02 PM2017-06-14T23:02:32+5:302017-06-14T23:02:32+5:30
दहा तासांनंतर औंधच्या हत्तीचं मथुरेकडे प्रस्थान
लोकमत न्यूज नेटवर्क
औंध : गेली अनेक दशके औंधवासीयांशी अतूट व जिव्हाळ्याचे भावनिक नाते असणारा औंध संस्थानचा गजराज ऊर्फ मोती हत्तीला नेण्यासाठी मथुरा येथील एलिफंट केअर सेंटरची सर्व यंत्रणा बुधवारी सकाळी औंध मध्ये दाखल झाली. मात्र, हत्तीच्या हट्टामुळे तब्बल दहा तासांनंतर त्याला घेऊन जाणाऱ्या वाहनानं औंध सोडलं. यावेळी हजारो ग्रामस्थांनी जड अंतकरणानं आपल्या लाडक्या गजराजाला निरोप दिला.
वन खाते,महसूल व पोलिस प्रशासन बुधवारी सकाळी सात वाजता औंधमध्ये हजर झाले. हत्तीला नेणार असल्याचे समजताच ग्रामस्थ, अबालवृद्ध यांच्यासह महिलांनी मोठ्या प्रमाणावर राजवाडा परिसरात गर्दी केली. औंध ग्रामस्थांच्या भावनेचा विचार करत प्रशासनाने संपूर्ण गावातून ग्रामस्थांच्या उपस्थितीत सकाळी हत्तीची मिरवणूक काढली. औंधसह परिसरातील हजारो नागरिकांच्या उपस्थितीत लाडक्या गजराजला भावपूर्ण निरोप देण्यासाठी नागरिक प्रचंड दु:खी झाले होते. महिला अक्षरश: धाय मोकलून रडत असल्याचे पाहून गजराजा नेण्यासाठी आलेले अधिकारीही भावनाविवश झाले होते. प्रत्येक गल्लीत लाडक्या गजराजाला सहकुटुंब बाहेर येऊन त्याला खायला देत दु:खी मनाने निरोप देत होते.
दरम्यान हत्तीला नेण्यासाठी आलेली मथुरा केअर सेंटरची गाडी औंधपासून दीड किमी अंतरावर थांबविण्यात आली होती. खरशिंगे रोडच्या बाजूला या गाडीजवळही हत्तीला निरोप देण्यासाठी हजारो ग्रामस्थ तिथे उपस्थित राहिले होते.
गजराज हत्ती सकाळी साडेअकराला तिथे जाण्यासाठी आला खरा पण; तब्बल तीन तास झाले तरी हत्ती त्या गाडीत चढलाच नाही. त्यामुळे सकाळी ७ वाजल्यापासून हत्ती हलविण्यासाठी सज्ज असलेले प्रशासन अक्षरश: हतबल झाले होते .एरवी हत्ती कोठेही जाताना काही मिनिटांतच गाडीत बसत होता. परंतु बुधवारी गजराजच्या पुढे माहूतसह सवार्नीच हात टेकले. सकाळी साडेअकरापासून हत्तीला गाडीत चढविण्यासाठी अनेक प्रयोग करण्यात आले. परंतु गजराज ने अक्षरश: सवार्ना घाम फोडला. हत्ती गाडीत बसेना म्हटल्यावर ग्रामस्थांसह युवकांनी प्रचंड आरडाओरडा करत हत्तीवर जबरदस्ती करू नका. त्याला इथेच राहायचं आहे तसेच मोती बचाव-पेटा भगावच्या घोषणा दिल्या.त्यामुळे पुन्हा सर्व प्रयन्त करून हतबल झालेल्या प्रशासनाने हत्ती तेथीलच हत्ती पूर्वी फिरत असलेल्या सरकारी मळ्यात नेऊन तिथे गाडीत बसविण्यासाठी सर्व यंत्रणेसह तिकडे पाचारण केले.
त्यानंतर हत्तीला सरकारी मळयात नेले. त्याठिकाणी मथुरा केअर सेंटरच्या गाडीत हत्तीला बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला पण त्यामध्येही हत्ती बसत नाही हे पाहिल्यानंतर मोकळ्या ट्रकमध्ये हत्तीला बसविण्याचा प्रयत्न करण्यात आला.त्यावेळी मात्र सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हत्ती त्या ट्रकमध्ये बसताच प्रशासकीय यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला. मागील तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या कारवाईला अखेर पूर्ण विराम मिळाला व अतिशय भावपूर्ण वातावरणात औंधवासियांनी गजराजाला निरोप दिला.
गजराज ऊर्फ मोती औंध येथून मथूरेकडे रवाना झाल्याने औंधसह पंचक्रोशितील अनेक गावांमध्ये बुधवारी निरव दिवसभर शांतता पसरली होती.
श्रीयमाई देवीला हत्तीकडून सलामी !
हत्ती ग्रामनिवासींनी मंदिराजवळ आल्यानंतर त्याने आपल्या सोंडेने श्रीयमाई देवीस सलामी देताच उपस्थित औंधकरांच्या अश्रूंचा बांध फुटला. त्यानंतर गजराजने राजवाड्यात जाऊन सलामी दिली.
अन् नागरिकांना अडविले
हत्ती दाद देईना हे लक्षात येताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी वडूजवरून फळ्या आणून फळक्यावर टाकूनही हत्तीला गाडीत बसविण्याचा प्रयत्न केला. पण हत्ती मथुरा केअर सेंटरच्या गाडीत चढलाच नाही. त्यानंतर अधिकारी वर्गाने लोकांची वाढती गर्दी.
४त्यानंतर तणाव पहाता हत्तीला सरकारी मळयात नेण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी ही नागरिक, युवक, महिला मोठ्या संख्येने हत्तीच्या पाठीमागे जाऊ लागताच पोलिस अधिकारी, कर्मचारी, आरसीबी फोर्सने त्यांना खरशिंगे रस्त्यावरील ओढयाजवळ अडवून धरले.