दहा लाखांचे खत अप्रमाणित
By Admin | Published: October 25, 2016 11:21 PM2016-10-25T23:21:41+5:302016-10-26T00:21:14+5:30
कृषी विभागाची कारवाई : येळावीतील क्लास वन अॅग्रोला नोटीस
सांगली : येळावी (ता. तासगाव) येथील क्लास वन अॅग्रो बायोटेक अॅन्ड फर्टिलायझर कंपनीचे नऊ लाख ९० हजार रुपये किमतीचे एक हजार ९८० पोती दुय्यम मूलद्रव्य (खत) नमुने अप्रमाणित आढळून आले आहेत. त्यामुळे जिल्हा परिषद कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सर्व खताला विक्री बंदचे आदेश दिले असून, खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये?, अशी नोटीसही बजाविली आहे.क्लास वन अॅग्रो बायोटेक अॅन्ड फर्टिलायझर कंपनीच्या खतांच्या नमुन्यांची पूर्वीही तपासणी केली होती. यामध्ये १०५ टन दुय्यम मूलद्रव्य खत अप्रमाणित आल्यामुळे, त्यांच्यावर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी विक्री बंदचे आदेश दिले होते. या कारवाईस महिना झाला आहे. तरीही कंपनीकडून पुन्हा उत्पादन चालूच होते. याबाबत जिल्हा परिषद विभागाचे कृषी विकास अधिकारी आर. जे. भोसले, मोहीम अधिकारी धनाजीराव पाटील यांच्याकडे तक्रारी आल्या होत्या. कृषी विभागाच्या पथकाने अचानक कंपनीला भेट देऊन तपासणी केली, तसेच खताचे पुन्हा नमुने घेतले. या खताचे नमुने तपासणीसाठी कृषी विभागाच्या प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम, मॅग्नेशिअम आणि सल्फर हे घटक कमी आढळून आल्याचे दिसून आले. त्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कंपनीने उत्पादित केलेल्या एक हजार ९८० पोती खताच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
खत कंपनीमध्ये त्रुटी आढळल्यामुळे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नोटीस बजावून, तुमचा खत निर्मितीचा परवाना रद्द का करू नये, असे म्हटले आहे. या नोटिसीला खत कंपनीने सात दिवसात उत्तर दिले नाही, तर तुमचा परवाना निलंबित केला जाईल, असेही नोटिसीत म्हटले आहे.
या कारवाईबरोबरच अन्य खत निर्मिती कंपन्यांच्या उत्पादनांचीही अचानक तपासणी करण्यात येणार असल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
नमुने अप्रमाणित : तरीही खताची निर्मिती
कृषी विभागाच्या भरारी पथकाने जुलै, आॅगस्ट या दोन महिन्यात कृषी सेवा केंद्रांची अचानक तपासणी करून, खताचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. ते शासकीय प्रयोगशाळेकडे पाठविले होते. यामध्ये कॅल्शिअम १०, मॅग्नेशिअम ५ आणि सल्फरची १० मात्रा असण्याची गरज होती. परंतु, तपासणीमध्ये कॅल्शिअम ४.७६, तर मॅग्नेशिअमची ४.७४ मात्रा आढळून आली आहे. कॅल्शिअमची मात्रा बहुतांश नमुन्यांमध्ये पन्नास टक्केपेक्षा कमी आढळून आली आहे. यामध्ये ३२ कंपन्यांच्या उत्पादनांमध्ये त्रुटी आढळल्याने त्यांनी विक्रेत्यांकडे पाठविलेल्या दोनशे टन खत विक्रीवर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी महिन्यापूर्वी बंदी घातली आहे. मात्र या कंपन्यांकडून उत्पादन घेतले जात आहेच. या कंपन्यांवरही कडक कारवाई करण्याची गरज आहे.