सांगली जिल्ह्यात नवीन दहा जनावरे लम्पी बाधित, पशुसंवर्धनकडून ३३ जनावरांवर उपचार सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2022 01:52 PM2022-09-13T13:52:08+5:302022-09-13T13:52:52+5:30
जिल्ह्यातील वाळवा, पलूस तालुक्यांत लंपी आजाराची जनावरे सापडली आहेत
सांगली : जिल्ह्यात सोमवारी शेखरवाडी (ता. वाळवा) येथे सहा आणि पलूस तालुक्यातील मोराळे, सावंतपूर, भिलवडी स्टेशन येथे चार अशा दहा जनावरांना लंपी आजाराची नव्याने बाधा झाली आहे. यामुळे लंपी जनावरांची जिल्ह्यात ३३ संख्या झाली आहे. दरम्यान, पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात लंपी जनावरांचा शोध घेण्यासाठी विशेष मोहीम राबविली जात आहे.
जिल्ह्यात लंपी त्वचा रोगाचा फैलाव दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागाने दक्ष झाला आहे. आजारी जनावरांची लगेच पाहणी करून त्याची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत लंपी त्वचा रोगाची २३ जनावरांना बाधा झाली होती. सोमवारी केलेल्या पाहणीमध्ये शेखरवाडीत सहा आणि मोराळे, सावंतपूर येथे प्रत्येकी एक, भिलवडी स्टेशन दोन अशा दहा जनावरांना नव्याने लंपी त्वचा रोगाची बाधा झाली आहे. या सर्व जनावरांवर पशुसंवर्धन विभागाकडून उपचार चालू झाले आहेत. तसेच चिकुर्डे, शेखरवाडीतील सहा जनावरांचा आजार बरा झाला असून, ते व्यवस्थित सध्या चारा खात आहेत, अशी माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. एस. एस. बेडक्याळे यांनी दिली.
११५०० जनावरांचे लसीकरण पूर्ण
जिल्ह्यातील वाळवा, पलूस तालुक्यांत लंपी आजाराची जनावरे सापडली आहेत. यामुळे या दोन तालुक्यांत लसीकरणास सुरुवात झाली असून, आतापर्यंत ११ हजार ५०० जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. मंगळवारी सांगलीतील पांझरपोळ येथील २०० गायींचे लसीकरण करणार आहे, असेही डॉ. बेडक्याळे यांनी सांगितले.
लसीचे दोन लाख डोस मिळणार
जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून एक लाख आणि राज्य शासनाकडून एक लाख असे दोन लाख लंपी त्वचा रोग प्रतिबंधक लस मिळणार आहे. जिल्हा परिषद स्वीय निधीतून वीस लाख रुपयांची औषधे आणि वीस लाख रुपयांची लस खरेदी करणार आहे. येत्या आठ दिवसांत जिल्ह्यात लस उपलब्ध होईल, अशी अपेक्षा असल्याचे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले.