एसटीच्या संपामुळे गमवावा लागला त्या दहा प्रवाशांना आपला जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2017 11:00 AM2017-10-21T11:00:09+5:302017-10-21T11:05:43+5:30
एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.
सांगली, दि. २१ : एसटीच्या संपामुळे ट्रकमधून प्रवास करणाऱ्या १0 प्रवाशांना आपल्या जीवाला मुकावे लागले आहे. सांगली जिल्ह्यातील मणेराजुरीजवळ फरशी वाहतूक करणारा ट्रक उलटून झालेल्या अपघातात १0 प्रवासी ठार झाले आहेत तर ९ प्रवासी जखमी झाले आहेत. मृतांमध्ये ३ महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे.
शनिवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातातील जखमींना सांगली आणि मिरजेच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हे सर्व प्रवासी फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून कर्नाटक सिंधगीवरून कराडकडे येत होते.
मणेराजुरी शिरढोण रोडवर मणेराजुरीपासुन २ कि.मी.अंतरावर शामनगर वस्तीजवळ एम एच ५०-४०१६ हा फरशीचा ट्रक उलटला. पहाटे हा ट्रक मणेराजुरीच्या माळावर आला असता धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा गेला. या अपघातात ट्रकच्या मागे फरशीवर बसलेले प्रवाशी फरशीखाली चिरडले गेले. यामध्ये जाग्यावर १0 जण ठार झाले आहे. ट्रकच्या केबिनमध्ये बसलेले अन्य ९ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. हे सर्व प्रवासी एसटीच्या संपामुळे सिंधगीहुन कराडकडे फरशी वाहतूक करणाऱ्या ट्रकमधून प्रवास करत होते.
मणेराजुरीनजीक दाट धुक्यामुळे ट्रक चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थ मदतीला धावले. त्यांनी जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयामध्ये हलविलेतर जेसीबीच्या साहाय्याने ट्रक खाली चिरडलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही घटना पहाटे २:३० वाजण्याच्या दरम्यान घडली. अपघात स्थळी तासगांव पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी धाव घेतली. फरशीच्या ढिगाऱ्याखालून जे.सी.बी.च्या मदतीने जखमींना आणि ठार झालेल्यांना बाहेर काढण्यात आले. मात्र एकुण किती प्रवाशी या ट्रकमध्ये होते याची माहिती मिळु शकली नाही.