‘एक्स्प्रेस’च्या करंट बुकिंगवर दहा टक्के सवलत झाली बंद, रेल्वेने प्रवाशांना दिला आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 07:02 PM2023-03-20T19:02:31+5:302023-03-20T19:02:54+5:30
या गाड्यात करंट बुकिंग उपलब्ध
सदानंद औंधे
मिरज : रेल्वेने आरक्षित तिकिटावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आर्थिक फटका दिला आहे. यापूर्वी आरक्षित तिकिटावरील सवलती रद्द केल्यानंतर रेल्वेने गेल्या आठवड्यापासून ‘करंट चार्ट’मधील (अंतिम यादी) प्रवाशांना तिकिटाच्या रकमेवर देण्यात येणारी १० टक्के सवलत रद्द केली आहे. त्यामुळे मिरजेतून येणाऱ्या - जाणाऱ्या ४० एक्स्प्रेस गाड्यांतून दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचे नुकसान होणार आहे.
रेल्वेने कोविड काळात ज्येष्ठ नागरिकांसह इतरांना तिकीट दरात दिलेली सवलत रद्द केली. आता ती पुन्हा सुरू होण्याची चिन्ह नाही. एक्स्प्रेसच्या आरक्षित तिकिटाच्या करंट बुकिंगसाठी प्रवाशांना तिकिटाच्या रकमेत देण्यात येणारी १० टक्के सवलत रेल्वेने दि. १३ मार्चपासून बंद केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू झाली असून, आरक्षण प्रणालीत सवलतीचा पर्याय हटविण्यात आला आहे. ही सवलत रद्द झाल्याने प्रवाशांचे आर्थिक नुकसान होणार आहे.
नेहमी फुल्ल असणाऱ्या एक्स्प्रेसच्या आरक्षित तिकिटासाठी रेल्वे प्रीमियम दर व तत्काळ शुल्काची आकारणी करते. मिरजेतून जाणाऱ्या गोवा दिल्ली महालक्ष्मी, चन्नम्मा, गांधीधाम, अजमेर, नागपूर, पूर्णा या गाड्यांना प्रीमियम दराने तिकीट आकारणी होत असल्याने यामुळे प्रवाशांना भुर्दंड सोसावा लागतो. आता रेल्वेने शिल्लक असलेल्या तिकिटांवरील सवलतही रद्द केली आहे. करंट चार्टमध्ये आरक्षित तिकिटावर प्रवाशांना तिकीट दरात मिळणारी १० टक्के सवलत पुन्हा सुरू करावी, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे सुकुमार पाटील यांनी केली.
करंट बुकिंग काय आहे
गाडीतील सीट आरक्षणाचा मुख्य चार्ट तयार झाल्यानंतर त्यात काही सीट शिल्लक राहिल्यास रेल्वे सुटण्यापूर्वी अर्धा तास आधी दुसरा करंट चार्ट तयार केला जातो. करंट बुकिंगची सुविधा प्रवास सुरू होणाऱ्या आरंभीच्या स्थानकावरील गाड्यांना व मुख्य स्थानकावरून धावणाऱ्या एक्स्प्रेस गाड्यांना लागू आहे. आरक्षित तिकिटावर सवलतीमुळे काही एक्स्प्रेसमध्ये शिल्लक राहणाऱ्या सीटदेखील भरतात. तिकिटात दहा टक्के सवलत दिल्याने प्रवाशांचाही फायदा होत होता.
या गाड्यात करंट बुकिंग उपलब्ध
हरिप्रिया, महालक्ष्मी, अजमेर, जोधपूर, गांधीधाम, अहमदाबाद, महाराष्ट्र, शरावती, कोयना, पूर्णा, चालुक्य, राणी चन्नम्मा, गोवा, निजामुद्दीन, दीक्षाभूमी, कलबुर्गी एक्स्प्रेस.