जतमधील दहा तलाव भरले
By admin | Published: November 9, 2014 10:48 PM2014-11-09T22:48:42+5:302014-11-09T23:29:00+5:30
दरीबडचीत ठणठणाट : संख, दोड्डनालात २० टक्के पाणीसाठा
गजानन पाटील -दरिबडची -परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने दमदार पावसाच्या अभावाने जत तालुक्यामध्ये २६ तलाव व २ मध्यम प्रकल्पांपैकी फक्त १० तलाव पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर संख, दोड्डानाला मध्यम प्रकल्पामध्ये १० ते २० टक्केपाणीसाठा आहे. परिसरातील कमी पावसामुळे दरीबडची येथील साठवण तलाव कोरडा ठणठणीत पडला आहे.
सध्या वाढलेली उन्हाची तीव्रता, रब्बी हंगामातील पिकांना होत असलेला पाणीपुरवठा, बाष्पीभवन यामुळे पाण्याची पातळी थोड्या प्रमाणात हळूहळू कमी होऊ लागली आहे. सध्या तालुक्यामध्ये १७६९.८६ द.ल.घ.फू. इतका पाणीसाठा आहे. यावर्षी भूजल साठा चांगला असल्याने उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई जाणवण्याची शक्यता आहे. उपलब्ध असलेल्या पाणीसाठ्याचे योग्य नियोजन, पाणी उपशाला जानेवारीअखेर बंदी घालणे आवश्यक आहे.
तालुक्यामध्ये दुष्काळ हा पाचवीला पूजलेला आहे. गेल्या चार वर्षांपासून पाऊस अत्यल्प पडल्यामुळे पाण्याची पातळी ५०० ते ६०० फुटांपर्यंत खाली गेली आहे. पावसाअभावी सलग दोन वर्षे रब्बी व खरीप हंगाम वाया गेला होता. पाण्याअभावी द्राक्षे, डाळिंब बागा काढून टाकाव्या लागल्या होत्या. विहिरी, कूपनलिका कोरड्या पडल्या होत्या. पिण्याच्या पाण्याची, जनावरांच्या चाऱ्याची समस्या निर्माण झाली होती.
यावर्षी मान्सून पावसाने जून महिन्यापासून थोड्या प्रमाणात हजेरी लावली होती. खरीप हंगामातील पिके आली होती. त्यानंतर मान्सून पावसाने सप्टेंबर महिन्यामध्ये दमदार हजेरी लावली होती. सर्व बंधारे, गावतलाव, पाझर तलाव भरून १० तलाव पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यामध्ये सोरडी, सिद्धनाथ, भिवर्गी, जालिहाळ बु।।, प्रतापूर, तिप्पेहळ्ळी, वाळेखिंडी, कोसारी, सनमडी हे तलाव भरले आहेत. यातील कोसारी, प्रतापूर, तिप्पेहळ्ळी तलाव भरण्यासाठी म्हैसाळ योजनांतील पाण्याचा उपयोग झाला आहे. मात्र परतीच्या मान्सून पावसाने दडी दिल्याने बहुसंख्य तलावातील पाण्याची पातळी ५० ते ६० टक्कयापर्यंत आहे, तर संख मध्यम प्रकल्पामध्ये १० टक्के पाणीसाठा, दोड्डनालामध्ये २५ टक्के पाणीसाठा आहे.
तलावातील पाणीसाठा
तलाव पातळी साठा
गुगवाड, ९३.३० १५.२५
बिळूर - ७.३०
उमराणी १०१.६० ७.९८
प्रतापपूर १०८.००५३.८८ खोजानवाडी -२.५०
रेवनाळ ६२३.२०, ११.६६
बिरनाळ ९६.२०८२.९४
तिप्पेहळ्ळी १०५.५०५५.९०
शेगाव ५७८.४०२७२.६५
शेगाव -२ -१.००
वाळेखिंडी ८९.००१४६.००
कोसारी १२०.८६५१.१५
मिरवाड ४०.५०१०.१३
डफळापूर ९७.००८.३४
बेळुंखी -४.००
येळवी ८३.००३१.२२
सनमडी ९८.८०७०.००
दोड्डनाला ५०६.००११६.३०
संख- सील - ६०.००
सिद्धनाथ ४८८.५० ८७.५५
सोरडी ९६.९५४५.५६
तिकोंडी ४३.४४, ३९.४५
जालिहाळ बु।। -पूर्ण संचय पातळी
तिकोंडी ५१.५१२३.९५
भिवर्गी ५०८२७०
दरीबडची साठवण तलाव कोरडा
दरीबडची परिसरामध्ये पाऊस कमी झाल्यामुळे साठवण तलाव पूर्णपणे कोरडा पडला आहे. तलाव बांधल्यापासून २००९ मध्ये पूर्ण क्षमतेने भरला होता. त्यानंतर तलाव भरलाच नाही. या तलावास ५ कि. मी. अंतरावरून पाणी येते. उद्भव साठ्यात वाटेत बंधारे, पाझर तलाव आहेत. ते भरून पाणी यावे लागते.