दहा हजार कामगारांचा येत्या सोमवारी सांगलीत मोर्चा, कामगार मंत्र्यांच्या घरासमोर धरणे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 6, 2023 06:15 PM2023-09-06T18:15:39+5:302023-09-06T18:16:19+5:30
रक्त तपासणी, माध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार
सांगली : रक्त तपासणी आणि माध्यान्ह भोजन योजना रद्द करून बांधकाम कामगारांच्या खात्यावर पैसे वर्ग करण्याची गरज आहे. तसेच घरकुलासह अन्य योजनेचे लाभ तत्काळ मिळाले पाहिजेत, या प्रमुख मागणीसाठी इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशनतर्फे सांगलीत कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर सोमवार, दि. ११ सप्टेंबर रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे.
इमारत व इतर बांधकाम कामगार फेडरेशनचे महासचिव भरमा कांबळे, किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख सांगलीत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, रक्त तपासणीच्या नावाखाली बांधकाम कामगारांच्या नावाखाली पैशाची शासन उधळपट्टी करीत आहे. यामध्ये हजारो कोटी रुपयांचा गैरव्यवहार झालेला आहे. तसेच माध्यान्ह भोजन योजनेतूनही कामगारांना जगविण्याऐवजी ठेकेदाराला जगविले जात आहे. यामुळे रक्त तपासणी आणि माध्यान्ह भोजन योजना बंद करून कामगारांच्या खात्यावर थेट पैसे जमा करावेत. अनेक कामगारांचे लाभाचे अर्ज मंजूर म्हणून मेसेज आले आहेत.
मात्र, त्यांच्या खात्यावर पैसे आलेले नाहीत ते तत्काळ कामगारांच्या खात्यावर जमा करावेत. घरकुलमधील जाचक अटी रद्द करून वडील किंवा सासरे यांच्या नावाने असलेल्या जागेच्या संमतीवर अर्ज मंजूर करा व मंजूर अर्जांना ताबडतोब अनुदान मिळाले पाहिजे, यासह १७ मागण्यांवर कामगार मंत्री खाडे यांच्याकडे वारंवार चर्चा झाली आहे; पण एकही मागणी आजअखेर पूर्ण झाली नाही. म्हणूनच कामगारमंत्री खाडे यांच्या सांगलीतील घरावर दि. ११ रोजी दहा हजार कामगार मोर्चा काढणार आहेत.
पाच हजार कोटींचा गैरव्यवहार
रक्त तपासणी, माध्यान्ह भोजन योजनेच्या माध्यमातून अधिकारी आणि ठेकेदारांनी बोगस बिल काढून पाच हजार कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला आहे. या सर्व गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भरमा कांबळे यांनी केली आहे.