अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी दहा वर्षांची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:32 AM2021-07-14T04:32:16+5:302021-07-14T04:32:16+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास दहा वर्षे सश्रम कारावासाची ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या तरुणास दहा वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनाविण्यात आली. संजय रामचंद्र वासकर (वय ३५, रा. जाधव प्लॉट, सांगली) असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्रन्यायाधीश डी. एस. हातरोटे यांनी हा निकाल दिला. सरकार पक्षातर्फे अति. जिल्हा सरकारी वकील वैशाली मुरचिटे यांनी काम पाहिले.
खटल्याची हकीकत अशी की, आरोपी वासकर हा विवाहित असून त्याला दोन मुलेही आहेत. सन २०१६ मध्ये परिचयाच्या असलेल्या अल्पवयीन मुलीस त्याने फूस लावून पळवून नेले होते. २ जून २०१६ राेजी तिला गणपतीपुळे येथे लॉजवर तो घेऊन गेला व तेथे या अल्पवयीन मुलीवर त्याने बलात्कार केला. याप्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. दाखल तक्रारीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक एस. बी. मासाळकर यांनी तपास करून दोषारोपपत्र दाखल केले. यात पीडितेसह ११ साक्षीदार तपासण्यात आले. पोक्सो कायद्यान्वये त्यास दोषी ठरविण्यात आले. सरकार पक्षातर्फे सादर साक्षी-पुराव्यांच्या आधारे आरोपीस दहा वर्षे सश्रम कारावास व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनाविण्यात आली.