तडवळेच्या आरोपीस दहा वर्षे सक्तमजुरी, मुलावर अत्याचार, पाच हजार रुपयांचा दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2017 12:58 PM2017-12-05T12:58:53+5:302017-12-05T13:02:59+5:30
अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तडवळे (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय ३५) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.
सांगली : अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार केल्याप्रकरणी तडवळे (ता. आटपाडी) येथील लक्ष्मण मच्छिंद्र गिड्डे (वय ३५) यास दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. अतिरिक्त जिल्हा व सत्रन्यायाधीश एस. एस. सापटणेकर यांनी सोमवारी हा निकाल दिला.
पीडित मुलगा १ आॅगस्ट २०१६ रोजी दुपारी दोन वाजता जनावरांना वैरण आणण्यास शेतात गेला होता. त्यावेळी लक्ष्मण गिड्डे याने त्याला स्वत:च्या घरात बोलावून त्याच्यावर अनैसर्गिक अत्याचार केला होता. घरी गेल्यानंतर मुलाने हा प्रकार त्याच्या वडिलांना सांगितला. त्यानंतर गिड्डेविरुद्ध आटपाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.
पोलिसांनी गिड्डेविरुद्ध लैंगिक अत्याचारापासून बालकाचे संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. या खटल्यात सरकारतर्फे सात साक्षीदार तपासण्यात आले. यामध्ये पीडित मुलगा, फिर्यादी व वैद्यकीय अधिकाºयांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सहाय्यक जिल्हा सरकारी वकील आरती साटवीलकर-देशपांडे यांनी खटल्याचे काम पाहिले.
चार हजार रुपये पीडित मुलास नुकसान भरपाई
न्यायालयाने गिड्डेला शनिवारी दोषी ठरवून सोमवारी शिक्षा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार त्याला दहा वर्षे सक्तमजुरी व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली. यातील चार हजार रुपये पीडित मुलास नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.