सांगली पेठ रस्त्याची निविदा २० रोजी उघडणार; ८८१ कोटीचा प्रकल्प, चार पदरी काँक्रिटचा रस्ता
By शीतल पाटील | Published: April 18, 2023 07:54 PM2023-04-18T19:54:46+5:302023-04-18T19:54:53+5:30
वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्याचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली-पेठ रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी ८८१ कोटीची निविदा प्रसिद्ध करण्यात आली होती. ही निविदा २० रोजी उघडली जाणार असल्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आले. या कामासाठी देशभरातील २० हून अधिक कंपन्यांनी प्री बिडिंगमध्ये सहभाग घेतला होता.
वाहनांची वाढती गर्दी, अपघातांचे वाढलेले प्रमाण, खड्ड्याचे साम्राज्य यामुळे ४१ किलोमीटरचा सांगली-पेठ रस्ता नेहमीच चर्चेत राहिला आहे. या रस्त्यावर अनेकांना जीव गमावावा लागला आहे. रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी पाच ते सहा वर्षापासून लढा सुरू आहे. सांगलीत सर्वपक्षीय कृती समितीने आंदोलन केले. त्यानंतर हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. महामार्ग प्राधिकरणाने रस्त्याच्या चौपदरीकरणाचा आराखडा तयार करून केंद्र शासनाला सादर केला होता. शासनाने या कामाला तत्वत: मंजुरीही दिली. त्यानंतर दोन महिन्यापूर्वी रस्त्यासाठी निविदाही प्रसिद्ध करण्यात आली. पण अर्थ समितीची मान्यता नसल्याने ठेकेदारांनी निविदा भरण्याबाबत सावध भूमिका घेतली. पालकमंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, जयंत पाटील यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भेटून मान्यता देण्याचा आग्रह धरला होता. अखेर दोन महि्न्यापूर्वी ८८१ कोटी ८७ लाख रुपयांची निविदा प्रसिद्ध केली होती. ही निविदा गुरुवारी उघडली जाणार आहे.
इपीसी मोड तत्वावर निविदा
सांगली-पेठ रस्त्यासाठी ‘ईपीसी’ मोड तत्वावर निविदा प्रसिद्ध केली आहे. यानुसार ठेकेदाराला अभियांत्रिकी आराखडे तयार करणे, त्यानुसार साहित्य खरेदी, देखरेख आणि बांधकाम अशा सर्व जबाबदाऱ्या पार पडाव्या लागतील. तसेच मंजूर निधीमध्येच काम पूर्ण करावे लागणार आहे. त्यामुळे कामावर वाढीव खर्च होणार नाही. परिणामी रस्त्याच्या गुणवत्तापूर्ण होण्यास मदत होईल. ठेकेदाराला दिलेल्या मुदतीत रस्ता पूर्ण करावा लागेल. अन्यथा त्याला आर्थिक दंडही होऊ शकतो.