वसंतदादा कारखान्यासाठी निविदा निघणार
By admin | Published: March 8, 2017 11:33 PM2017-03-08T23:33:58+5:302017-03-08T23:33:58+5:30
प्रक्रियेबाबत अजूनही संभ्रम : सांगली जिल्हा बँकेने मागविला कायदेशीर अभिप्राय; महिन्याभरात निर्णय
सांगली : वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासाठी रितसर निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमार्फत थकीत देण्यांसंदर्भातील कायदेशीर बाबींची तपासणी सुरू आहे. निविदा प्रक्रिया वसंतदादा कारखान्याने राबवायची, की कोणी याबाबतचा निर्णय येत्या आठवड्यात होणार आहे.
वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहे. कामगार, शेतकरी आणि बँकांची देणी थकीत आहेत. त्यामुळे कारखाना चालविण्यास देण्याची मागणी सभासदांकडून अनेकवेळा झाली होती. कारखाना प्रशासनानेही यापूर्वी कारखाना भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्याबाबत अनेक कंपन्यांशी चर्चाही केली होती. आता या प्रयत्नांना गती आली आहे. कर्नाटक आणि महाराष्ट्रातील जवळपास १२ साखर कारखान्यांनी वसंतदादा कारखाना चालविण्यास घेण्याबाबत रस दाखविला आहे. यातील काहींशी चर्चाही सुरू आहे. यामध्ये कर्नाटकातील रेणुका शुगर, उगार शुगर, शिवशक्ती शुगर लिमिटेड, संकेश्वर कारखाना, अथणी शुगर, कोल्हापुरातील व्यंकटेश्वरा शुगर, सांगली जिल्ह्यातील क्रांती सहकारी साखर कारखाना, सातारा जिल्ह्यातील सह्याद्री साखर कारखाना आदींचा समावेश आहे.
कारखाना भाडेतत्त्वावर देण्याची चर्चा सुरू झाल्यानंतर काही शेतकरी संघटनांनी छुप्या पद्धतीने या गोष्टी सुरू असल्याबद्दल संताप व्यक्त केला होता. कारखाना व्यवस्थापनाच्या पारदर्शीपणाबद्दलही शंका उपस्थित केली होती. भाडेतत्वावर कारखाना देण्याची ही प्रक्रिया रितसर निविदा प्रक्रियेने पार पाडण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. वसंतदादा कारखान्याकडून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेस येणेबाकी आहे. कर्जाची ही थकबाकी असल्याने जिल्हा बँकेमार्फतच निविदा प्रक्रिया राबविण्यात यावी, अशी मागणी झाली होती.
वसंतदादा कारखाना प्रशासनानेही निविदा प्रक्रिया जिल्हा बँकेमार्फत राबविली जाण्याबाबत संकेत दिले आहेत. त्यामुळे जिल्हा बँकेने कारखान्याच्या याबाबत कायदेशीर अहवाल मागविला आहे. निविदा प्रक्रियेचा अधिकार बँकेला नसल्याचे काहींचे मत आहे. तरीही एकूणच कारखान्याची थकबाकी आणि निविदा प्रक्रियेअंतर्गत त्याची वसुली याबद्दल कायदेशीर अभिप्राय महत्त्वाचा ठरणार आहे. (प्रतिनिधी)