तेंडूलकर, उर्मिलाच्या प्रेरणेने मोकाट कुत्र्यांची संगोपन मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2021 04:32 AM2021-09-09T04:32:32+5:302021-09-09T04:32:32+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : मोकाट कुत्र्यांची भीती, त्यांच्याकडून होणारे हल्ले यामुळे नागरिक, महापालिका प्रशासन हैराण झाले आहे. या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : मोकाट कुत्र्यांची भीती, त्यांच्याकडून होणारे हल्ले यामुळे नागरिक, महापालिका प्रशासन हैराण झाले आहे. या प्रश्नांचे उत्तर त्यांना गेल्या अनेक वर्षांत सापडलेले नाही. महान क्रिकेटपटू सचिन तेंडूलकर, अभिनेत्री उर्मिला यांच्यासह अन्य सेलिब्रेटिंनी या मोकाट कुत्र्यांना घरी आणून त्यांचे संगोपन केल्याने त्यांच्या प्रेरणेतूनही सांगलीत ही मोहीम सुरू झाली आहे.
‘गावठी कुत्र्यांना दत्तक घ्या, तुमच्या घरात त्याला स्थान द्या’, असे आवाहन करीत जिल्ह्यातील प्राणीमित्रांनी अनोखी मोहीम हाती घेतली आहे. सचिन तेंडूलकर, अभिनेत्री माधुरी दीक्षित, ऊर्मिला मार्तोंडकर, अक्षया देवधर यांच्यासह सेलिब्रिटींनी गावठी कुत्री दत्तक घेऊन त्यांच्यासोबतचे फोटो शेअर केले आहेत. नागरिकांनीही अशी कुत्री दत्तक घ्यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे.
भटक्या कुत्र्यांची समस्या सांगलीला पूर्वीपासून सतावत आहे, तशी मुंबईतही आहे. मुंबईतील सेलिब्रेटिंनी यावर अनोखा मार्ग काढला. सोशल मीडियावरून त्यांच्या या मोहिमेचा मोठा गवगवा झाला. त्याची दखल सांगलीतील प्राणीमित्रांनी व नागरिकांनी घेतली. मोकाट कुत्र्यांना पुरेसे अन्न मिळाले नाही तर ती आक्रमक होतात. त्यामुळे लॉकडाऊन काळात सांगलीतील प्राणीमित्रांनी अन्न शिजवून कुत्र्यांची भूक भागवण्याची मोहीम राबवली होती. त्यांची संख्या मर्यादित राहावी, कमी व्हावी, यासाठी नसबंदीची मोहीम आहेच; मात्र ती फारशी प्रभावी ठरलेली दिसत नाही. त्याबाबत प्राणीमित्रांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काही लोक आता या मोहिमेत सहभागी होत गावठी कुत्र्याचे पिलू मागत आहेत.
मोहीम सुरू झाल्यानंतर बुधवारी एकाचदिवशी ३७ पिलांची मागणी आल्याचे सामाजिक कार्यकर्ते सतीश साखळकर यांनी सांगितले. प्राणीक्लेश प्रतिबंधक समितीचे सदस्य मुस्तफा मुजावर यांनी सांगितले की, नसबंदीची मोहीम अखंडितपणे सुरू राहिली पाहिजे. त्याबाबत काहीच होणार नसेल, तर समस्या सुटणार कशी?
चौकट
कुत्र्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यावे!
नागरिक विकास मंचचे सतीश साखळकर यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन दिले. यात म्हटले आहे की, पकडली जाणारी कुत्री ठेवण्यासाठी योग्य आसरा करावा, तसेच नसबंदी मोहिमेबाबत तातडीने पावले उचलावीत.