टेंभू योजना आज सुरू होणार? सहा कोटींचा टंचाई निधी योजनेकडे वर्ग : कारखानदारांकडून ४ कोटींची पाणीपट्टी जमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2018 11:49 PM2018-01-17T23:49:10+5:302018-01-17T23:49:36+5:30
कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे.
कडेगाव : टेंभू उपसा सिंचन योजनेची २१ कोटी ८७ लाख इतकी वीजबिल थकबाकी आहे. यापैकी किमान ५० टक्के वीजबिल थकबाकी भरून वीजपुरवठा पूर्ववत सुरू होणार आहे. आता राज्य शासनाकडून टेंभू योजनेचा ६ कोटी इतका टंचाई निधी जमा झाला आहे. कृष्णा खोरे विकास महामंडळाकडून ही रक्कम टेंभू योजनेकडे वर्ग झाली आहे. यामुळे योजना गुरूवारीच सुरू होण्याची शक्यता आहे.
योजनेसाठी केन अॅग्रो रायगाव कारखान्याकडून २ कोटी, ग्रीन पॉवर गोपूजकडून ७५ लाख, सोनहिरा वांगीकडून ५० लाख व अन्य जमा, असे एकंदरीत ४ कोटी रुपये जमा आहेत. ही रक्कम तातडीने महावितरणकडे भरून वीजपुरवठा पूर्ववत जोडून गुरुवारी टेंभू योजना सुरू करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
चालूवर्षी टेंभू योजनेचे पहिले आवर्तन मिळण्यास विलंब झाल्याने लाभक्षेत्रातील शेतीपिके कोमेजून चालली आहेत. अशा परिस्थितीत आता टेंभू योजना सुरू होत असल्यामुळे लाभक्षेत्रातील शेती पिकास जीवदान मिळणार आहे. राज्य शासनाकडे सिंचन योजनांचा टंचाई उपाय योजना निधी अडकला होता. हा निधी मिळविण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार पृथ्वीराज देशमुख, आमदार अनिल बाबर आदी नेत्यांनी पाठपुरावा केला.
आमदार मोहनराव कदम यांनी सोनहिरा, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी केन अॅग्रो, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी ग्रीन पॉवर या कारखान्यांच्या माध्यमातून टेंभू योजनेची शेतकºयांच्या ऊसबिलातून वसूल झालेली पाणीपट्टी भरली आहे. त्यामुळे आता टंचाई निधी आणि कारखान्यांकडून वसूल झालेली पाणीपट्टी अशी १० कोटींची रक्कम वीजबिल थकबाकीपोटी तात्काळ भरली जाणार आहे आणि टेंभू योजनाही तत्काळ सुरू केली जाणार आहे.
तिन्ही योजनांसाठी १४ कोटी वर्ग
टेंभू, ताकारी व म्हैसाळ या तिन्ही योजनांचा एकंदरीत १४ कोटी इतका टंचाई उपाय योजना निधी राज्य शासनाकडून वर्ग झाला आहे. यामध्ये टेंभू योजनेचा ६ कोटी, म्हैसाळ योजनेचा ५ कोटी ५० लाख, तर ताकारी योजनेचा २ कोटी ५० लाख इतका टंचाई उपाय योजना निधी आहे. हा निधी वर्ग झाल्यामुळे योजनांची वीजबिल थकबाकी भरण्यास मदत झाली आहे.
आवर्तनासाठी यंत्रणा सज्ज
योजना सुरू करण्यासाठी सर्व तांत्रिक बाबी पूर्ण केल्या आहेत. वीजपुरवठा पूर्ववत जोडताच टेंभू योजना सुरू होईल. आवर्तनासाठीची सर्व यंत्रणा सज्ज आहे. महावितरणकडून सर्वतोपरी सहकार्याची गरज आहे, असे टेंभू योजनेचे कार्यकारी अभियंता राजन रेड्डीयार यांनी सांगितले.