कवठेमहांकाळला झेंडा लावण्यावरून तणाव
By admin | Published: July 8, 2015 11:50 PM2015-07-08T23:50:47+5:302015-07-08T23:50:47+5:30
दोन गटात वादावादी : पोलीस अधिकारी, राजकीय नेत्यांच्या मध्यस्थीनंतर परिस्थिती नियंत्रणात
कवठेमहांकाळ : शहरातील युववाणी चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून मंगळवारी रात्री दोन गटात वादावादी झाली. बुधवारी दुपारपर्यंत प्रचंड तणाव निर्माण झाला होता. उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे व जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य सभापती गजानन कोठावळे, उपसरपंच चंद्रशेखर सगरे, युवराज पाटील यांच्यासह शांतता समितीच्या बैठकीनंतर वातावरण निवळले. दुपारनंतर सर्व व्यवहार सुरळीत चालू झाले.
एका कार्यक्रमानिमित्त काही युवकांनी युववाणी चौकातील विजेच्या खांबावर झेंडा लावला होता. सोमवारी दुसऱ्या गटाच्या तीन ते चार तरुणांनी एकत्रित येऊन या झेंड्यापासून काही अंतरावर लाकडी चबुतरा तयार करून त्यावर दुसरा झेंडा लावला. त्यामुळे मंगळवारी रात्री तरुणांच्या दोन गटात वादावादी झाली. वादावादी सुरू झाल्याचे कळताच पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांनी घटनास्थळी धाव घेतली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जलद कृती दलाची एक तुकडीही मागवली. पोलीस बंदोबस्तात दोन्ही झेंडे उतरविण्याचे काम सुरू केले. दुसऱ्यादिवशी या प्रश्नावर तोडगा काढण्याचे आश्वासन देऊन मोहिते यांनी पडदा टाकला.
बुधवारी सकाळी चार तरुणांनी मारहाण केल्याचा आरोप करीत एक गट आक्रमक झाला. युवराजअण्णा पाटील, अनिल पाटील, दिलीप गिड्डे यांच्यासह शहरातील व तालुक्याच्या विविध गावांतील तरुण तहसील कार्यालयाच्या आवारात जमा झाले. रात्री मारहाण करणाऱ्यांना तात्काळ अटक करा, अन्यथा शहर बंद करू, असा पवित्रा त्यांनी घेतला.
वातावरण चिघळण्याची चिन्हे दिसताच पोलिसांनी जलद कृती दलाची एक तुकडी मागवली. निरीक्षक मोहिते यांनी म्हसोबा गेटजवळून अनिल पाटील यांना ताब्यात घेतले. हा प्रकार समजताच उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे यांनी कवठेमहांकाळमध्ये येऊन परिस्थितीचा आढावा घेतला. उपविभागीय पोलीस अधिकारी बजरंग बनसोडे, गजानन कोठावळे, उपसरपंच चंद्रशेखर सगरे, युवराजअण्णा पाटील, प्रदीप वाले, गोविंद पाटील, दिलीप पाटील, बाळासाहेब पाटील, दिनकर पाटील, प्रदीप शिंदे, अनिल पाटील, दिलीप गिड्डे, संजय चव्हाण, मोहन पाटील, पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांच्यासह दोन्ही गटातील प्रतिनिधींची बैठक झाली.
बैठकीत विनापरवाना झेंडे लावणारे आणि पोलीस बंदोबस्तात झेंडे उतरविण्याचे काम सुरू असताना मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी कोठावळे यांनी केली.
बनसोडे यांनी त्याचे आदेश पोलीस निरीक्षक मोहिते यांना दिले. त्यानंतर युवराज पाटील यांनी युवकांना शांत राहण्याचे आवाहन केले. दुपारनंतर पोलीस, शांतता समिती व नागरिक यांच्यातही बैठक झाली. त्यानंतर शहरातील तणाव पूर्ण निवळला. (वार्ताहर)
युवराज मोहिते यांची बदली
काही महिन्यांपासून वादाच्या भोवऱ्यात अडकलेले येथील पोलीस निरीक्षक युवराज मोहिते यांची अखेर सांगली मुख्यालयाकडे तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीच्या वृत्तानंतर कवठेमहांकाळ शहरात शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी फटाक्याची आतषबाजी करून जल्लोष केला. युवराज मोहिते यांनी १० जून २०१४ रोजी कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कार्यपद्धतीवरून वाद निर्माण झाला होता. त्यांच्याविरोधात जवळपास सर्वच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी तक्रारींचा भडीमार केला होता. गुन्ह्यांचे प्रमाणही वाढले होते. मागील महिन्यात सर्वपक्षीय आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर मोहिते यांची तडकाफडकी बदली करण्यात आली.