अज्ञाताने बॅनर फाडल्याने करगणीत तणाव, घटनेच्या निषेधार्थ गाव बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2022 12:00 PM2022-06-03T12:00:45+5:302022-06-03T17:47:09+5:30
पोलिसांनी काही तरुणांना अरेरावीची भाषा वापरल्याने गावात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता.
आटपाडी : करगणी तालुका आटपाडी येथे अज्ञाताने बॅनर फाडल्याने तणाव निर्माण झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावात बंद पाळण्यात आला आहे. यावेळी पोलिसांनी काही तरुणांना अरेरावीची भाषा वापरल्याने गावात काही काळ मोठा तणाव निर्माण झाला होता. रासपाचे जिल्हा अध्यक्ष लक्ष्मण सरगर यांनी संशयिताचा शोध घेऊन तत्काळ अटक करण्यात यावी याबाबत पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांना पत्र दिले. संतप्त झालेल्या तरुणांनी करगणी औट पोस्ट मधील कुरवे पोलीस बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप केला आहे.
करगणी येथे जयंतीनिमित्त बॅनर लावण्यात आला होता. दरम्यान काल, गुरुवारी रात्रीच्या सुमारास एका अज्ञाताने हे बॅनर फाडले. आज, शुक्रवारी सकाळी हा प्रकार ग्रामस्थाच्या निदर्शनास येताच चौकात युवक जमा झाले. संतप्त झालेल्या युवकांनी करगणीतील बाजारपेठ बंद करत बॅनर फाडल्याचा निषेध व्यक्त केला.
दरम्यान यावेळी संतप्त युवकांशी पोलिसांची हुज्जत झाली. पोलीस निरीक्षक शरद मेमाणे यांनी घटनास्थळी धाव घेत संतप्त युवकांची समजूत काढात अज्ञात व्यक्तीचा शोध घेऊन लवकरच त्याला अटक करण्यात येईल असे सांगितल्याने जमाव शांत झाला.