गावात तणाव! गव्हाणमध्ये यात्रा रद्द झाल्यानंतर मंदिर उघडले
By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 07:56 PM2021-05-26T19:56:48+5:302021-05-26T19:58:18+5:30
Cancel yatra in Gawan : लक्ष्मी मंदिर उघडण्यावरून वादंग
तासगाव (जि. सांगली) : तालुक्यातील गव्हाण येथील लक्ष्मी देवीची यात्रा कोरोना प्रादुर्भावामुळे रद्द करण्यात आली आहे. मात्र बुधवारी सकाळी मंदिर उघडे करून पूजाअर्चा केल्यामुळे माजी सरपंच अभिजित पाटील यांनी आक्षेप घेत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यामुळे गावात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
गव्हाण येथील लक्ष्मी देवीची यात्रा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रद्द केली आहे. त्यामुळे भक्तांनी मंदिर परिसरात गर्दी करू नये, कोणीही मंदिरात नैवेद्य दाखवायला येऊ नये, असे आवाहन यात्रा कमिटी आणि ग्रामपंचायतीने केले होते.
मंदिराचे मानकरी दत्ता पवार यांनी बुधवारी सकाळी मंदिरात जाऊन पूजा केली. देवीला नैवेद्य दाखवला. याची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल केली. यावेळी त्यांनी मास्क घातला नव्हता. त्यामुळे बेकायदेशीर मंदिर उघडणाऱ्या पवार यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी अभिजित पाटील, तुकाराम यादव यांनी केली.
दत्ता पवार जर पूजा करीत असतील तर सर्वसामान्य लोकही मंदिरात जाऊन पूजा करतील, अशी भूमिका घेऊन काहींनी मंदिर उघडले, मात्र पोलिसांनी तत्काळ मंदिर बंद केले. त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. मंदिर परिसरात आणखी गर्दी झाली. पोलिसांनी मंदिर परिसरात बंदोबस्त ठेवला. परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता.
दुकानातून परतत असलेल्या १० वर्षीय तरुणीला ६० वर्षीय म्हाताऱ्याने रस्त्यात रोखले अन् केले अश्लील चाळे https://t.co/YcKMEnYYqP
— Lokmat (@MiLOKMAT) May 26, 2021
मोजक्या मानकऱ्यांनी मंदिरात जाऊन पूजा करण्याचे ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीच्या बैठकीत ठरले होते. दत्ता पवार मानकरी आहेत, असे स्पष्टीकरण सरपंच हणमंत पाटील यांनी दिले आहे. शिवाय याबाबतीत ग्रामपंचायत आणि यात्रा कमिटीची काहीही तक्रार नाही, असेही त्यांनी सांगितले.