मतदार नेण्यावरून लेंगरेवाडीत दोन गटांत तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:31 AM2021-01-16T04:31:00+5:302021-01-16T04:31:00+5:30
करगणी : लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे मतदार मतदानासाठी नेण्यावरून दोन गटांत वाद झाला. यामुळे गावात दिवसभर ताणावाचे वातावरण होते. ...
करगणी : लेंगरेवाडी (ता. आटपाडी) येथे मतदार मतदानासाठी नेण्यावरून दोन गटांत वाद झाला. यामुळे गावात दिवसभर ताणावाचे वातावरण होते. याप्रकरणी पोलिसांत नोंद झालेली नाही.
लेंगरेवाडी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आमदार गोपीचंद पडळकर व तानाजी पाटील गट विरुद्ध अमरसिंह देशमुख गट यांच्यात लढत होती. शुक्रवारी दोन्ही गटांकडून मतदारांना वाहनातून ने-आण करण्यासाठी चुरस सुरू होती. करलमळा येथे दोन्ही गटांतील कार्यकर्ते मतदारांना आणण्यासाठी गेले होते. संतोष लेंगरे यांच्या दुचाकीला काही कार्यकर्त्यांनी गाडी आडवी घातल्याने ते गाडीवरून पडले. त्यांच्या हाताला व पायाला जखम झाली. यावरून मतदान होत असलेल्या ठिकाणी येत दोन्ही गटांतील कार्यकर्ते एकमेकांसमोर भिडले. यामुळे काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
यानंतर काही कार्यकर्त्यांनी पोलिसांत धाव घेतली. दिवसभर तक्रार देण्याचे काम सुरू होते, मात्र रात्री उशिरापर्यंत रीतसर तक्रार दाखल नव्हती.
चाैकट
पोलिसांची फक्त बघ्याची भूमिका
मतदान केंद्रापासून हाकेच्या अंतरावर सुरू असणारी वादावादी बंदोबस्तासाठी तैनात असणाऱ्या पोलिसांना सांगूनही पोलिसांनी बघ्यांची भूमिका घेतली व घटनास्थळी जाण्याचे टाळले. काही अनुसूचित प्रकार घडला नाही; मात्र पोलीस असूनही काही अनुसूचित प्रकार घडला असता त्यास कोण जबाबदार, असा सवाल ग्रामस्थांतून विचारला जात आहे.