राज्याप्रमाणे सांगली जिल्ह्यातील युतीतही तणाव : संघर्ष विकोपाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 11:52 PM2019-11-10T23:52:35+5:302019-11-10T23:53:05+5:30
भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे. राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणल्याची टीका उघडपणे शिवसेना पदाधिका-यांनी केली होती.
अविनाश कोळी ।
सांगली : राज्यातील भाजप-शिवसेना युतीत असलेला तणाव सांगली जिल्ह्यात निवडणुकीपासूनच जाणवत आहे. भाजपच्या हातातील सत्तेच्या दोऱ्या सुटत असल्याने जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्ये आनंद व्यक्त होत आहे, तर कॉँग्रेस व राष्टÑवादीमध्येही आनंदाची लकेर उमटली आहे. जिल्ह्यातील भाजपमध्ये यामुळे प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे.
राज्यातील सरकार स्थापनेच्या घडामोडींनी जिल्ह्याच्या राजकारणावर परिणाम होत असून, त्यामुळे समीकरणेही बदलत आहेत. राज्यातील सरकार स्थापनेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. भाजप-सेनेला स्पष्ट कौल मिळाल्यामुळे शिवसेनेपेक्षा भाजपच्या नेते, पदाधिकाऱ्यांना मोठा उत्साह होता. अल्पावधितच हा उत्साह मावळला आहे.
राज्याप्रमाणेच सांगलीतही भाजप-शिवसेनेत जोरदार संघर्ष सुरू झाला आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत प्रत्येक ठिकाणी शिवसेनेला अडचणीत आणल्याची टीका उघडपणे शिवसेना पदाधिका-यांनी केली होती. त्यामुळे भाजपच्या नावाने बोटे मोडणाºया शिवसैनिकांना भाजपच्या एकाकीपणामुळे आनंद होत आहे.
युतीअंतर्गत जिल्ह्यातील एकूण आठ विधानसभा मतदारसंघांपैकी चार जागा भाजपकडे व चार जागा शिवसेनेकडे गेल्या होत्या. यामध्ये शिवसेनेच्या वाट्याला खानापूर, पलूस-कडेगाव, इस्लामपूर आणि तासगाव हे मतदारसंघ आले होते. आमदार अनिल बाबर यांनी गतवेळेप्रमाणे यंदाही विजय मिळविला असला तरी, अन्य तीन जागांवर शिवसेनेला विजय मिळविता आला नाही.
भाजपने इस्लामपूरमध्ये बंडखोर उमेदवार उभा केला तर, पलूस-कडेगावमध्ये नोटाला मतदान केल्याबद्दल शिवसेनेचे पदाधिकारी राग व्यक्त करीत आहेत. शिवसेना या जखमा कधीच विसरणार नाही, अशा शब्दात त्यांनी नाराजीही व्यक्त केली होती. निवडणुकीपूर्वीही भाजप-शिवसेनेत मानापमान नाट्य रंगले होते.
युतीअंतर्गत ही धुसफूस सुरू असतानाच राज्यातही दोन्ही पक्षांत तणाव वाढल्याने जिल्ह्यातील काही शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजप सत्तास्थानी येऊ नये म्हणून देव पाण्यात घातले होते. भाजपला सत्ता स्थापनेत येत असलेल्या अडचणी पाहूनही जिल्ह्यातील शिवसेनेत आनंद व्यक्त होत आहे.
दुसरीकडे जिल्ह्यात सर्वाधिक तीन जागा जिंकून क्रमांक एकवर विराजमान झालेल्या राष्टÑवादीत आणि भाजपच्या बरोबरीने जागा जिंकणाºया कॉँग्रेसमध्ये उत्साह दिसून येत आहे. अलिप्त असलेले कार्यकर्तेही आता पक्षाच्या मुख्य प्रवाहात दिसत आहेत. एकूणच कॉँग्रेस-राष्टÑवादीतील उत्साह वाढत आहे. राज्यातील सत्तेतून भाजप बाजूला होण्याचे संकेत मिळत असल्याने त्यांच्या आनंदात भर पडली आहे.एकूणच राज्याच्या राजकीय समीकरणांचा परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावरही होत असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.
समित्यांवर नियुक्त्या : सेना नाराज
जिल्हा नियोजन समितीपासून विविध योजनांच्या जिल्हा, तालुका स्तरावरील समित्यांमध्ये शिवसेनेला युतीच्या ठरलेल्या ‘फॉर्म्युल्या’प्रमाणे स्थान मिळाले नाही. ‘६६-३३’प्रमाणे जागावाटप ठरले असताना, शिवसेनेला २० टक्क्यांहून कमी पदे मिळाली. त्यामुळे गेली पाच वर्षे नाराजी व्यक्त होत होती. जिल्हा नियोजन समितीत ५ जागांवर दावा केलेल्या शिवसेनेला केवळ ३ जागा दिल्यानेही शिवसैनिक नाराज होते. अशा परिस्थितीत राज्यातील वादामुळे स्थानिक पातळीवरील वादही आता उफाळून आला आहे.
सर्वच स्तरावर भाजप लबाड : विभुते
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, राज्याच्या राजकारणातच नव्हे, तर स्थानिक पातळीवरही भाजप लबाडपणा करीत आली आहे. गेल्या पाच वर्षांत युतीचे नाटक करून शिवसेनेला संपविण्याचा डाव भाजपने आखला होता. शिवसेनाप्रमुखांनी भाजपबद्दल व्यक्त केलेले मत योग्यच असून, स्थानिक पातळीवरही आम्हाला भाजपचा असाच किंवा त्याहून वाईट अनुभव आहे. त्यामुळे भाजपच्या अधोगतीला त्यांचा स्वभाव कारणीभूत आहे. जिल्ह्यातील खानापूरचा अपवाद वगळता शिवसेनेच्या तिन्ही जागा पाडण्यात भाजपचा हात आहे. लोकसभा आणि गतवेळच्या विधानसभा निवडणुकीतील मतांचे आकडे पाहिले तर, भाजपने केलेली गद्दारी स्पष्टपणे दिसून येते.
भाजप प्रामाणिकच : देशमुख
भाजपने जिल्ह्यात युतीधर्माचे पालन प्रामाणिकपणे केले आहे. पलूस-कडेगावची जागा ही भाजपलाच मिळायला हवी होती. आम्ही तशी मागणीही नेतृत्वाकडे केली होती, मात्र त्यास प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे ज्याठिकाणी भाजपचे प्राबल्य होते तिथे शिवसेनेला जनाधार मिळाला नाही. यात भाजपने काम केले नाही, हा आरोप चुकीचा आहे, असे मत भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांनी व्यक्त केले.