मिरजेतील सभापतींचा राजीनामा लांबणीवर!
By admin | Published: August 22, 2016 11:53 PM2016-08-22T23:53:56+5:302016-08-23T00:30:48+5:30
काँग्रेस नेत्यांचा आदेश नाही : पंचायत समिती सदस्य नाराज
मिरज : काँग्रेस नेत्यांचा आदेश नसल्याने मिरज पंचायत समितीच्या सभापती जयश्री पाटील यांचा राजीनामा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पाटील यांना सभापती पदाचा कालावधी दि. १६ आॅगस्टपर्यंत देण्यात आला होता.
मिरज पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात पूर्व-पश्चिम असे दोन भाग येतात. सभापती व उपसभापती निवडीत दोन्ही भागांसाठी समन्वय साधला जात होता. सभापतीपद पूर्व भागाला दिल्यास उपसभापतीपद पश्चिम भागाला दिले जाते. मात्र गेल्या चार वर्षातील निवडीत समन्वय न साधल्याने याचा अधिक फायदा पूर्व भागाला झाला. अशोक मोहिते यांचा अपवाद वगळता पश्चिम भागातील एकाही सदस्यास सभापती पदाची संधी मिळाली नाही. मोहिते यांच्या राजीनाम्यानंतर पूर्व भागातील सदस्य सुभाष पाटील, दिलीप बुरसे यांना पाठोपाठ सभापती पदाची संधी मिळाली. बुरसे यांच्या राजीनाम्यानंतर पश्चिम भागाला संधी मिळावी, यासाठी कर्नाळचे सदस्य प्रवीण एडके यांनी सभापती पदावर हक्क सांगितला होता. मात्र नेत्यांनी त्यांना डावलून पुन्हा पूर्व भागाच्या सदस्या जयश्री पाटील यांना सभापती पदाची संधी दिली. जयश्री पाटील यांच्या माध्यमातून पूर्व भागाला सलग तिसऱ्यांदा सभापती पदाची संधी दिल्याने काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेबाबत पश्चिम भागात नाराजी दिसून आली. ही नाराजी लक्षात घेऊन सभापती जयश्री पाटील यांच्या निवडीवेळी त्यांना १६ आॅगस्टपर्यंत पदाचा कालावधी दिला होता. पाटील यांच्या राजीनाम्यानंतर प्रवीण एडके हे सभापती पदाचे एकमेव दावेदार असल्याने, त्यांना सभापती पदाची संधी देऊन, पश्चिम भागाला न्याय देण्याचा काँग्रेस नेत्यांनी निर्णय घेतला आहे.
काँग्रेस नेत्यांच्या आदेशानंतर राजीनामा देण्याची परंपरा आहे. सभापती पाटील यांना दिलेली दि. १६ आॅगस्टपर्यंतची मुदत पूर्ण झाली आहे. नेत्यांचा अद्याप आदेश नसल्याने सभापती जयश्री पाटील यांनी राजीनामा दिलेला नाही. आदेश येईपर्यंत त्यांचा राजीनामा लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. राजीनाम्याबाबत पंचायत समितीतही अद्याप शांतता दिसत आहे. निर्णय घेण्यास विलंब झाल्यास जयश्री पाटील या सभापतीपदी कायम राहण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. त्यामुळे नेत्यांच्या भूमिकेकडे सदस्यांचे लक्ष लागून आहे. (वार्ताहर)
आदेश येताच राजीनामा : जयश्री पाटील
काँग्रेसच्या नेत्यांच्या निर्णयामुळे आपणास सभापती पदाची संधी मिळाली आहे. सदस्यांनीही निवडीत सहकार्य केले. अल्प कालावधीसाठी संधी मिळाली असली तरी, या कालावधित सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन तालुक्याच्या हिताचे निर्णय घेतले. नेत्यांच्या आदेशास आपण बांधील असून त्यांचा आदेश येताच सभापती पदाचा राजीनामा देणार असल्याचे सभापती जयश्री पाटील यांनी सांगितले.