Sangli News: मोरबगीत वाळूतस्करांची दहशत, तलाठ्यावर तलवारहल्ल्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2023 04:00 PM2023-01-03T16:00:16+5:302023-01-03T16:00:47+5:30

घटनेने जत तालुक्यात उडाली खळबळ

Terror of sand smugglers in Morbagi of Sangli district, attempted sword attack on Talathi | Sangli News: मोरबगीत वाळूतस्करांची दहशत, तलाठ्यावर तलवारहल्ल्याचा प्रयत्न

संग्रहीत फोटो

Next

संख : मोरबगी (ता. जत) येथे वाळूतस्करी रोखणाऱ्या तलाठ्यावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. तलवारीची दहशत दाखवून कारवाईपासून रोखले. तलाठ्याच्या समोरून अवैध वाळूने भरलेली ट्रॅक्टर-ट्रॉली पळवून नेली. या घटनेने जत तालुक्यात खळबळ उडाली आहे.

बभ्रुवाहन भानुदास शिंदे (वय ४०, रा. मोरे कॉलनी, जत) मोरबगीचे तलाठी आहेत. या परिसरात वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यामुळे दि. ३० व ३१ दरम्यानच्या मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मोरबगी येथील हनुमान मंदिराजवळ साथीदारांसह ते थांबले होते.

याच वेळी या मंदिराजवळून विना क्रमांकाची निळ्या रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली एक ब्रास वाळू घेऊन चालली होती. शिंदे यांनी ट्रॅक्टरचालक गुलाब मीरासाहेब सनदी (रा. भिवर्गी, ता. जत) याला थांबवले. अवैध वाळू वाहतुकीबाबत त्याला विचारणा केली. तेव्हा वाळूतस्करीचा प्रकार समोर आला.

तलाठी शिंदे यांनी वाहन ताब्यात घेतले. वाहनचालक सनदी यासही ताब्यात घेतले. मध्यरात्री अडीचच्या सुमारास सनदी याचे सात सहकारी तेथे आले. त्यापैकी दोघांच्या हातात तलवारी होत्या. तलवारीच्या साह्याने त्यांनी दहशत पसरवली. तलाठी शिंदे यांच्यावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न झाला. त्यांच्या साथीदारांवरही दहशत पसरवण्यात आली.

त्यांच्यासमोरच ट्रॅक्टर-ट्रॉली आणि त्यातील एक ब्रास वाळू घेऊन लवंगा रस्त्याच्या दिशेने पसार झाले. याबाबत उमदी पोलिस ठाण्यात तलाठी शिंदे यांनी गुलाब सनदी याच्यासह आठ जणांविरुद्ध फिर्याद दिली आहे. यानुसार उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.

Web Title: Terror of sand smugglers in Morbagi of Sangli district, attempted sword attack on Talathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.