Crime News: चोरट्यांची दहशत, मध्यरात्री फायरिंग करत एटीएम मशिनच नेले उचलून; सांगली जिल्ह्यात खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 11:11 AM2022-05-21T11:11:57+5:302022-05-21T11:13:57+5:30
दरोडा टाकत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठलं निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले.
कवठेमहांकाळ : मध्यरात्री फायरिंग करत चोरट्यानी शिरढोण येथील महाराष्ट्र बँकेचे एटीएम मशिनच बोलेरो गाडीतून उचलून नेले. भर वस्तीत असणाऱ्या एटीएम वर चोरट्याचा धाडसी दरोडा टाकल्याने कवठेमहांकाळ तालुक्यात एकच खळबळ उडाली. आज, शनिवारी मध्यरात्री २ च्या दरम्यान हा दरोडा टाकल्याची माहिती आहे.
याबाबत घटनास्थळवरून मिळालेली माहिती अशी, कवठेमहांकाळ तालुक्यातील रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या शिरढोण गावात चोरट्यांनी भर वस्तीत धाडसी दरोडा टाकला. यावेळी चोरट्यांनी फायरिंग करत एटीएम मशीनच उचलून नेले. दरोडा टाकत असताना दुसऱ्या मजल्यावरील घरमालक अर्जुन विठलं निकम जागे झाले. त्यांनी चोरट्यांच्या दिशेने दगड टाकला. परंतु या चोरट्यानी त्यांच्या दिशेने फायरिंग केले.
घरमालक निकम यांनी भीतीने दार लावून घेतले. ही गोळी दुसऱ्या दिशेने गेल्याने ते बचावले. तेवढ्यात या चोरट्यानी आपले काम फत्ते करत पलायन केले. या मशीन मध्ये पन्नास लाख मशीन मध्ये असल्याची चर्चा आहे. निकम यांनी या घटनेची माहिती तातडीने कवठेमहांकाळ पोलीस यांना रात्रीच दिली.
चोरट्यांनी दुसरे मशिनही नेण्याचा प्रयत्न असल्याचे घटनास्थळावरुन दिसून आले. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षितकुमार गेडाम, जत विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले ,अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा डुबल यांनी आज तातडीने भेट दिली. आणि पोलिसांना तपासाच्या सूचना केल्या. घटनास्थळी श्वान पथक पाचारण करण्यात आले, परंतु ते थोड्या अंतरावर जाऊन तिथेच घुटमळत होते. कवठेमहांकाळ पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून तपासासाठी पथके रवाना केली आहेत. या घटनेने कवठेमहांकाळ तालुक्यात मोठी खळबळ माजली आहे.