पेठनाक्यावरील कापड उद्योग ‘सलाईन’वर
By admin | Published: January 13, 2015 11:41 PM2015-01-13T23:41:45+5:302015-01-14T00:29:45+5:30
राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम : हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ
अशोक पाटील - इस्लामपूर 0-पेठनाका (ता. वाळवा) परिसरातील इको बोर्ड कंपनीने गाशा गुंडाळल्यानंतर आता तेथील एका वस्त्रोद्योग प्रकल्पाचीही तशीच अवस्था झाली आहे. हा कारखाना कोणत्याही क्षणी बंद पडणार असून, तेथील हजारो कामगारांवर उपासमारीची वेळ येणार आहे.
माजी ग्रामविकास मंत्री जयंत पाटील यांनी मतदारसंघातील महिलांच्या हाताला रोजगार देण्यासाठी पेठनाका येथे राष्ट्रीय महामार्गालगत खासगी स्वरूपातील कापड उद्योग आणला. परिसरातील हजारो एकर जमीन विकत घेऊन हा प्रकल्प उभा करण्यात आला. या प्रकल्पासाठी ज्यांच्या जमिनी घेतल्या, त्यांच्या मुलांना येथे नोकरी देण्यात आली. सध्या हा कारखाना अडचणीत आला असून, कामगारांना शासनाच्या नियमानुसार पगार दिला जात नाही. चार-चार तास जादा काम करूनही त्याचा मोबादला मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. प्रकल्प सुरू झाल्यापासून भविष्य निर्वाह निधीची रक्कम शासनाकडे जमा नसल्याचे आढळून आले आहे. काही कामगारांनी याचा जाब विचारला असता, त्यांना कामावरून कमी करण्यात आले.
हा वस्त्रोद्योग प्रकल्प अडचणीत असून, काहींनी तर या प्रकल्पात समावेश असलेल्या छोट्या उद्योगांवरील अनुदान लाटून त्याच्याशी संबंधित जागाही विकल्या आहेत.
जयंत पाटील यांनी तालुक्याच्या विकासासाठी आणलेल्या उद्योगांपैकी वाळवा येथील भवरी स्टार्च, इको बोर्ड आणि औद्योगिक वसाहतीतील काही उद्योग बंद पडले आहेत. त्यापाठोपाठ आता पेठनाक्यावरील कापड उद्योगाचीही तशीच अवस्था झाली आहे.
कामगारांत घुसमट
वेळेत पगार मिळत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून बरेच कामगार नोकरी सोडून गेल्याने येथे कामगार मिळणेही अवघड झाले आहे. या प्रकल्पात राजकीय मंडळींचा हस्तक्षेप झाला असून, राजकारणातून विरोधकांच्या गटातील कामगार तडकाफडकी काढून टाकण्यात आले आहेत. या प्रकल्पात पात्रता नसताना अधिकाऱ्यांची नेमणूक केली गेली आहे. ते अधिकारी आता कामगारांना दमदाटी करीत आहेत. त्यामुळे यातील बहुतांशी कामगारांनी कामावर न जाणेच पसंत केले असून, त्यांच्या पगारापोटी असलेल्या लाखोंच्या रकमा देण्यासही टाळाटाळ केली जात असल्याचे काही कामगारांनी सांगितले.
पेठनाका येथील कापड उद्योगासाठी पिकाऊ जमिनी घेतल्या आहेत. ज्या भूमिपुत्रांना नोकरीवर घेतले, त्यांना आता पगारही दिले जात नाहीत. कामगार कायदा धाब्यावर बसवला आहे. कारखान्याची अवस्था दयनीय झाली आहे. हा उद्योग काही दिवसातच गुंडाळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राजकीय हस्तक्षेपामुळे कारखान्यातील भागीदार उद्योजक हैराण झाले आहेत. कामगारांना न्याय देण्यासाठी प्रसंगी आंदोलन करू.
- सम्राट महाडिक,
जिल्हा परिषद सदस्य, पेठ.