बनावट नोटाप्रकरणी डोंगरसोनीत छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 11:47 PM2019-01-20T23:47:32+5:302019-01-20T23:47:36+5:30
सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीतील विश्वनाथ सुहास जोशी याच्या सांगलीतील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीतील ...
सांगली : बनावट नोटांची छपाई करून त्या चलनात आणणाऱ्या टोळीतील विश्वनाथ सुहास जोशी याच्या सांगलीतील शामरावनगर येथील अरिहंत कॉलनीतील ‘विजया निवास’ या बंगल्यातून नोटांच्या आकाराची कागदी बंडले व ती कटिंग करण्याचे यंत्र जप्त केले आहे. कोल्हापूरच्या गांधीनगर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिरा ही कारवाई केली.
पोलीस मागावर असल्याची चाहूल लागताच जोशी पसार झाला आहे. त्याचे तासगाव तालुक्यातील डोंगरसोनी हे मूळ गाव आहे. रविवारी दुपारी गांधीनगर पोलिसांनी डोंगरसोनी येथेही छापा टाकला. पण त्याचा सुगावा लागला नाही. बनावट नोटांची छपाई जोशीच्या सांगलीतील बंगल्यात केली जात होती, अशी माहिती प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. अटकेतील अभिजित पवार (रा. उचगाव, ता. करवीर) याची कसून चौकशी सुरु आहे. चौकशीतून प्रवीणकुमार उपाध्ये (रा. इचलकरंजी) याचेही नाव निष्पन्न झाले आहे. उपाध्ये व जोशी या दोघांकडून अभिजित पवार हा बनावट नोटा नेत होता.
जोशीच्या शोधासाठी शनिवारी रात्री गांधीनगर पोलिसांचे पथक सांगलीत दाखल झाले होते. पथकाने सांगली पोलिसांना कोणतीही माहिती न देता जोशीच्या अरिहंत कॉलनीतील बंगल्यावर छापा टाकला. मध्यरात्रीपर्यंत पथकाने बंगल्याची झडती घेतली. यामध्ये नोटांच्या आकाराची कागदी बंडले मोठ्या प्रमाणात सापडली. तसेच ही बंडले कटिंग करण्याचे यंत्रही सापडले. पंचांसमक्ष हे साहित्य जप्त केले आहे. पथकाने जोशीच्या कुटुंबियांकडे चौकशी केली. त्यावेळी हे कुटुंब मूळचे डोंगरसोनीचे असल्याची माहिती मिळाली. पथकाने रविवारी डोंगरसोनीत जाऊन चौकशी केली. मात्र जोशीचा तिथेही सुगावा लागला नाही.
अभिजित पवारला कोठडी
बनावट नोटा विक्रीप्रकरणी अटक केलेल्या अभिजित राजेंद्र पवार (वय ३७, रा. उचगावपैकी निगडेवाडी) याला तीन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली. या गुन्ह्यातील आणखी दोन संशयित विश्वनाथ सुहास जोशी (रा. सांगली) व प्रवीण अजितकुमार उपाध्ये (रा. इचलकरंजी) हे फरार आहेत. अभिजितला गांधीनगर रेल्वे स्टेशननजीक अटक केली होती. त्याने बनावट नोटा सांगलीत तयार झाल्याचे सांगितले आहे.