ठकास महाठक, पैशाच्या तगाद्यापासून वाचण्यासाठी तरुणाने लढवली अशी काही शक्कल की...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2021 12:39 PM2021-12-06T12:39:21+5:302021-12-06T12:39:53+5:30
चौकशीत सुरुवातीला त्याने कोल्हापूर येथून शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे घेऊन सांगलीकडे येत असताना, अंकली पुलाजवळ आपल्याला लुटल्याचे व आणखी खंडणीसाठी अपहरण केल्याचे सांगितले.
सांगली : पैशाच्या तगाद्यापासून वाचण्यासाठी तरुणाने स्वत:च्याच अपहरणाचा बनाव केला. अभिजित गजानन एडगे (रा. खोतवाडी, ता. मिरज) असे त्या तरुणाचे नाव असून, त्यास शहर पोलिसांनी पंढरपूर येथून ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, अज्ञात व्यक्तीने खंडणीसाठी आपल्या भावाचे अपहरण केल्याची फिर्याद अभिजितचा मावसभाऊ समाधान बाळू व्हनमाने (रा. सांगलीवाडी) याने सांगली शहर पोलीस ठाण्यात दिली होती. त्यात भाऊ अभिजित याचे अज्ञाताने अपहरण केले असून त्याला सोडण्याच्या मोबदल्यात दोन लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्याचे फिर्यादीत म्हटले होते. शुक्रवारी (दि. ३) बाराच्या सुमारास सांगलीत हा प्रकार झाल्याचे त्यात म्हटले होते. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला होता. अपहरण झालेल्या अभिजितने फोन करून असे भावाला सांगितले होते. तांत्रिक तपासाआधारे पोलिसांनी त्यास पंढरपूर येथून ताब्यात घेतले.
पाेलीस चौकशीत सुरुवातीला त्याने कोल्हापूर येथून शेअर मार्केटमध्ये गुंतवलेले पैसे घेऊन सांगलीकडे येत असताना, अंकली पुलाजवळ आपल्याला लुटल्याचे व आणखी खंडणीसाठी अपहरण केल्याचे सांगितले. मात्र, तो सांगत असलेली कहाणी आणि परिस्थिती यांत विसंगती आढळत असल्याने पोलिसांना संशय होता. त्यानुसार तपास सुरू केल्यानंतर अखेर त्याने पैशाचा तगाद्यापासून वाचण्यासाठी स्वत:च्या अपहरणाचा बनाव केल्याचे सांगितले. तरीही रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून त्याचा जबाब नोंदविण्याचे काम सुरू होते.