नोटाबंदीविरोधात कॉँग्रेसचा थाळीनाद
By admin | Published: January 9, 2017 10:56 PM2017-01-09T22:56:42+5:302017-01-09T22:56:42+5:30
सांगलीत आंदोलन : माळवाडीतील घटनेचाही निषेध
सांगली : नोटाबंदी निर्णयाविरोधात सोमवारी कॉँग्रेसच्यावतीने सांगलीच्या स्टेशन चौकात घंटानाद व थाळीनाद आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत कार्यकर्त्यांनी धरणे धरले.
कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम, शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. स्टेशन चौकात थाळीनाद व घंटानाद आंदोलन करतानाच नोटाबंदीच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. यावेळी पृथ्वीराज पाटील म्हणाले की, केंद्र सरकारने घेतलेल्या नोटाबंदीच्या निर्णयाचे परिणाम लोक आजही भोगत आहेत. चांगल्या परिणामांचे आमिष दाखवून प्रत्यक्षात जनतेच्या पदरात समस्या टाकण्यात आल्या. बॅँका आणि एटीएम केंद्रांमधील रांगा अजूनही कायम आहेत. पन्नास दिवसांची मुदत पंतप्रधानांनी मागितली होती. ही मुदत संपली तरी, लोकांना अद्याप पैसे मिळत नाहीत. रोजगार घटला आहे. जिल्हा बॅँकेवरील निर्बंधामुळे शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनता अडचणीत आली आहे. सरकारला या गोष्टींकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करायचे आहे. हा निर्णय फसला असतानाही ते या गोष्टी मान्य करण्यास तयार नाहीत. त्यामुळे आम्ही जनतेचे हे प्रश्न सुटेपर्यंत आंदोलन करीत राहू, असा इशारा त्यांनी दिला.
प्रदेश महिला कॉँग्रेसच्या उपाध्यक्षा शैलजाभाभी पाटील म्हणाल्या की, नोटाबंदीमुळे सामान्य जनतेसमोर विशेषत: महिलांसमोर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. प्रत्येक घरातील अर्थचक्र बिघडले आहे. याचा प्रत्यक्ष मन:स्ताप महिलांना सहन करावा लागत आहे. लोकांमधील संताप वाढत आहे. सरकारने वेळीच पावले उचलली नाहीत, तर लोकांच्या संतापास त्यांना तोंड द्यावे लागेल. नोटाबंदीच्या विरोधात महिला कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. आंदोलनात अखिल भारतीय कॉँग्रेस कमिटीचे निरीक्षक राजा सलीम, माजी महापौर कांचन कांबळे, अजित ढोले, नगरसेविका शेवंता वाघमारे, रोहिणी पाटील, मृणाल पाटील, वहिदा नायकवडी, सुवर्णा पाटील, इंद्रजित साळुंखे, मंगेश चव्हाण, राजन पिराळे, धनराज सातपुते, आयुब निशाणदार, जावेद शेख, ए. पी. बनसोडे, रावसाहेब माणकापुरे, सुखराजसिंह धिल्लॉ आदी सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)
माळवाडीतील घटनेचा निषेध
महिला पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आंदोलनावेळी माळवाडी (ता. पलूस) येथील शाळकरी मुलीच्या बलात्कार व खुनाच्या घटनेचा निषेध केला. मुलीस श्रद्धांजली वाहण्यात आली. सांगली शहर जिल्हा महिला कॉँग्रेसच्या अध्यक्षा वहिदा नायकवडी यांनी जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिले. माळवाडी प्रकरणातील आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी करण्यात आली.