दुष्काळी तालुक्यांमध्ये पाणी आले.. पण प्रश्न नाही सुटले, पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडींचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 01:55 PM2022-06-27T13:55:21+5:302022-06-27T13:56:19+5:30
शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे.
आटपाडी : टेंभूचे पाणी सध्या बहुतांश दुष्काळी तालुक्यामध्ये आले असले तरी, पाणी आल्यामुळे प्रश्न सुटले नाहीत. यासाठी शेतकऱ्यांना संघटित ठेवून चळवळीच्या रेट्यातून दुष्काळी भागाचे प्रश्न सोडविण्याला यापुढील काळात प्राधान्य देऊ, असे प्रतिपादन तेरा दुष्काळी तालुक्यांच्या पाणी संघर्ष परिषदेचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी केले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने कृष्णा खोऱ्यातील तेरा दुष्काळी तालुक्यांची २९ वी पाणी संघर्ष परिषद रविवारी आटपाडी येथे पार पडली. यावेळी डॉ. बाबूराव गुरव, माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख, चंद्रकांत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, डॉ. अनिकेत देशमुख, महादेव देशमुख, शिवाजीराव पाटील, सावंता पुसावळे, सचिन देशमुख उपस्थित होते.
वैभव नायकवडी म्हणाले, शेतकरी संघटित असल्याशिवाय प्रश्न सुटत नाहीत. नागनाथअण्णांनी सुरुवातीला दुष्काळी भागात पाणी देण्याचे स्वप्न बघितले. लोकांना विश्वासात घेतले. आज ते स्वप्न सत्यात उतरले आहे. तेरा दुष्काळी तालुक्यांतील अपुरी कामे पूर्ण होण्यासाठी पैसे उपलब्ध होणे खूप महत्त्वाचे आहे. यासाठी गरजेप्रमाणे धडक मारण्याची तयारी ठेवली पाहिजे. चळवळीच्या रेट्यामुळे काही योजना कार्यान्वित झाल्या आहेत. त्या यशस्वीरीत्या चालविण्यासाठी यापुढील काळात लढा असेल.
पाणी आलेल्या भागातील शेतकऱ्यांनी चळवळीत सहभाग होणे गरजेचे आहे. २९ वर्षांपूर्वी जे स्वप्न होते, ते आता सत्यात यायला लागले आहे. नवीन पिढीला सामावून घेणे व त्यांच्यापुढे इतिहास मांडणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या संघटित ताकदीशिवाय प्रश्न सुटणार नाहीत. यामुळे आपल्याला संघटनेची ताकद वाढवणे गरजेचे आहे. भविष्यातील संघर्षासाठी आपण तयार राहूया.
डॉ. बाबूराव गुरव म्हणाले, आज दुष्काळी भागात पाणी आले आहे. मात्र ते शेतकऱ्याच्या बांधापर्यंत अजून पाेहाेचले नाही. समन्यायी पाणी वाटप योजनेचे अद्याप शासनाने नियोजन केले नाही. यासाठी चळवळीच्या माध्यमातून जनरेटा उभा करावा लागेल.
राजेंद्रअण्णा देशमुख म्हणाले, सध्या निसर्ग लहरी बनला आहे. शासनही लहरी बनले आहे. त्यांच्या लहरीप्रमाणेच पाण्याचे आवर्तन सुरू आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. आवर्तनाच्या नियोजनासाठी चळवळीच्या माध्यमातून प्रयत्न करणे गरजेचे आहे.
प्रा. बाळासाहेब नायकवडी यांनी प्रास्ताविक केले. प्रा. दादासाहेब ढेरे, शिवाजीराव पाटील, सुभाष पाटील, आर. एस. चोपडे, चंद्रकांत देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, प्रा. शिवाजीराव काळुंगे आदींनी मनोगत व्यक्त केले.
नागनाथअण्णांच्या स्मारकासाठी एक एकर जागा
आमच्या आटपाडीसारख्या दुष्काळी भागावर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांचे फार मोठे ऋण आहेत. त्यांचा दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठीचा लढा मोठा आहे, हे येणाऱ्या नवीन पिढीला उमजावे यासाठी आटपाडीमध्ये डॉ. नागनाथअण्णांचे स्मारक उभारण्याचा संकल्प आहे. यासाठी एक एकर जागा देणार असल्याचे राजेंद्रअण्णा देशमुख यांनी यावेळी जाहीर केले.