सांगली जिल्ह्यात लवकरच ग्रामपंचायत निवडणुकींचा बिगुल वाजणार; लोकसभा, विधानसभा लढतीची रंगीत तालीम होणार
By अशोक डोंबाळे | Published: August 31, 2023 03:47 PM2023-08-31T15:47:26+5:302023-08-31T15:50:19+5:30
ग्रामपंचायतींवर वर्चस्व ठेवण्यासाठी नेत्यांचे कार्यकर्त्यांना बळ
अशोक डोंबाळे
सांगली : जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून मतदार याद्या, प्रभागांचे आरक्षण निश्चित झाले आहे. कोणत्याही क्षणी जिल्हा प्रशासन निवडणुका घोषित करण्याची शक्यता आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम म्हणूनच भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे नेते ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांकडे लक्ष ठेवून आहेत. ग्रामीण राजकारणाचा कणा असलेल्या ग्रामपंचायतींवर आपलेच वर्चस्व राहिले पाहिजे, यासाठी सर्वच पक्षाच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांना बळ देण्यास सुरुवात केली आहे.
जिल्हा परिषद, दहा पंचायत समित्या, काही नगरपंचायतींवर प्रशासक आहे. यात भर म्हणून ८६ ग्रामपंचायतींमध्येही प्रशासक असल्यामुळे दुसऱ्या फळीतील नेतृत्वामधील नेत्यांविरोधात प्रचंड असंतोष खदखदत आहे. लोकसभा निवडणुका डिसेंबर २०२३ ते मे २०२४ पर्यंत केव्हाही होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीच्या पूर्वी ग्रामीण मतदारांचा कल समजून घेण्यासाठी ८६ ग्रामपंचायतींच्या निवडणूका सप्टेंबरमध्ये होण्याची शक्यता आहेत. अधिकाऱ्यांनी तसे संकेतही दिले आहेत. त्यादृष्टीने त्यांनी निवडणुकीची तयारी केली आहे.
प्रशासनाचा हा अंदाज घेऊन भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवेसनेच्या नेत्यांनी ग्रामपंचायती आपल्या ताब्यात खेचून आणण्यासाठी रणनीत आखली आहे. नेत्यांकडून कार्यकर्त्यांना ग्रामपंचायत निवडणुकीच्या दृष्टीने बळही दिले जात आहे. सर्वाधिक २९ ग्रामपंचायतींच्या निवडणुका शिराळा तालुक्यात होत असून राष्ट्रवादीचे आमदार मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, भाजपचे सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक यांनी सर्वाधिक ग्रामपंचायती आपल्या गटाकडे खेचण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यानंतर कवठेमहांकाळ तालुक्यात १९ आणि आटपाडी तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आहे.
या दोन्ही तालुक्यांत राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटीचा परिणाम होणार आहे. भाजपचे माजी आ. राजेंद्रअण्णा देशमुख, आ. गोपीचंद पडळकर, शिवसेनेचे तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे हणमंतराव देशमुख गटग्रामपंचायत निवडणुकीत सक्रिय झाला आहे. कवठेमहांकाळ तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी आमदार सुमनताई पाटील, खासदार संजय पाटील, माजी मंत्री अजितराव घोरपडे गटानेही माेर्चेबांधणी सुरू केली आहे.
जत, वाळवा, मिरज, पलूस, कडेगाव तालुक्यांमध्ये दोन ते पाच ग्रामपंचायतींच्या निवडणुका आहेत. संख्या कमी असली तरी मोठ्या ग्रामपंचायतीमुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत निर्णायक अशी गावे आहेत. त्यामुळे या तालुक्यातील नेत्यांचेही ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर लक्ष आहे. कारण, या ग्रामपंचायतींवर लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील राजकारण सोपे जाणार आहे.
या ग्रामपंचायतींमध्ये रणधुमाळी
तालुका - संख्या
शिराळा - २९
आटपाडी - १६
क.महांकाळ - १९
जत - ५
मिरज - ३
तासगाव - २
खानापूर - ३
पलूस - ३
वाळवा - ४
कडेगाव - २
ग्रामपंचायतींवरही 'प्रशासक'राज
जिल्ह्यातील ८६ ग्रामपंचायतींमधील सदस्यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे तेथे सध्या प्रशासकांची नियुक्ती आहे. म्हणून जिल्हा प्रशासनाने आयोगाच्या सूचनेनुसार आरक्षण सोडत काढण्यासह मतदार याद्या तयार केल्या आहेत. कोणत्याही क्षणी ग्रामपंचायतींच्या निवडणुका घेण्याबाबत शासनाकडून सूचना येताच घेण्यात येतील. त्यादृष्टीने जिल्हा प्रशासनाने निवडणुकीची पूर्ण तयारी केली आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.