वैद्यकीय प्रवेशाची सांगता, सर्व शाखा हाउसफुल्ल; सहा महिने चालली प्रक्रिया
By अविनाश कोळी | Published: December 1, 2023 12:04 PM2023-12-01T12:04:10+5:302023-12-01T12:04:49+5:30
१४१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अधांतरीच
अविनाश कोळी
सांगली : राज्यातील वैद्यकीय शाखेच्या प्रवेश प्रक्रियेची सांगता गुरुवारी ३० नोव्हेंबरला झाली. सहा महिने चाललेल्या या प्रक्रियेत एम. बी. बी. एस., दंतवैद्यकीय, आयुर्वेद, होमिओपॅथी अशा सर्व शाखा हाउसफुल्ल झाल्या. शेवटची फेरी विनापरवाना ऑफलाइन घेतली. त्यामध्ये एम. बी. बी. एस.ला प्रवेश मिळालेल्या १४१ विद्यार्थ्यांचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे.
नीट-२०२३ चा निकाल यंदा १३ जूनला लागल्यानंतर लगेचच वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झाली होती. या प्रक्रियेत यावर्षी अनेक बदल दिसून आले. महाराष्ट्रात एम. बी. बी. एस. तसेच आयुर्वेदच्या प्रवेशावेळी झालेल्या काही चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका बसला. एम. बी. बी. एस.ची शेवटची फेरी ऑफलाइन घेतली गेल्याने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने १४१ विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द ठरविले. त्यामुळे त्यांचे भवितव्य अद्याप अधांतरी आहे.
आयुष शाखेच्या सर्व फेऱ्या ऑनलाइन पार पडल्या. मात्र, शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये १४ नवीन आयुर्वेदिक कॉलेजमधून १ हजार ११० जागा अचानक वाढल्यामुळे आधी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना या कॉलेजमध्ये प्रवेश घेता आला नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चांगले गुण असूनही त्यांचा आयुर्वेद शाखेचा प्रवेश हुकला.
कोणत्या शाखेसाठी किती जागा होत्या?
महाराष्ट्रात यंदा एम. बी. बी. एस.च्या ९,७९६, दंत वैद्यकीयच्या २,८७४, आयुर्वेदच्या ७,६८४ आणि होमिओपॅथिकच्या ४,२३८ जागा उपलब्ध होत्या. बहुतांश सर्व जागा भरल्या गेल्या.
वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया ६ महिने सुरू राहिल्यामुळे विद्यार्थी आणि पालक यांना ताणतणावास सामोरे जावे लागले. काही महाविद्यालयांत अगोदरच अभ्यासक्रम सुरू झाल्यामुळे उशिरा प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. त्यामुळे हा कालावधी कमी करणे आवश्यक आहे. यावर्षी वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत अनेक चांगले बदल झाले असले तरीही काही त्रुटीही दिसून आल्या. त्या दूर करणे गरजेचे आहे. - डॉ. परवेज नाईकवाडे, वैद्यकीय प्रवेश प्रक्रिया समुपदेशक, सांगली