सांगली विमानतळासाठी पंतप्रधानांना ५० हजार पत्रे पाठवणार, येत्या सोमवारी मोहिमेचा प्रारंभ
By शीतल पाटील | Published: June 16, 2023 06:57 PM2023-06-16T18:57:16+5:302023-06-16T19:00:13+5:30
मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’ असा नाराही पत्राच्या माध्यमातून दिला जाणार
सांगली : कवलापूर येथील १६० एकर जागेवर विमानतळ व्हावे, या मागणीसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ५० हजार पत्रे पाठवली जाणार आहेत. सोमवार १९ रोजी सकाळी १० वाजता मारुती चौकातून या मोहिमेला सुरवात होणार आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’ असा नाराही पत्राच्या माध्यमातून दिला जाणार आहे.
याबाबत विमानतळ बचाव कृती समितीचे निमंत्रक पृथ्वीराज पवार आणि सतीश साखळकर यांनी सांगितले की, कवलापूर येथील विमानतळासाठी सांगलीकरांचा जनरेटा वाढला आहे, मात्र दिल्लीच्या पातळीवर आवाज अजून पोहोचलेला नाही. विमानतळ बचाव कृती समितीने नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेऊन विमानतळाला मान्यतेची मागणी केली आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. पालकमंत्री सुरेश खाडे, खासदार संजय पाटील, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार अनिल बाबर यांनीही सहकार्याची भूमिका घेतली आहे. परंतू हालचाली थांबलेल्या आहेत. त्या पुन्हा सुरु करण्यासाठी तब्बल ५० हजार पत्रे दिल्लीला पाठवण्याचा निर्णय समितीने घेतला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत सांगलीकरांचा आवाज पोहचण्याची गरज आहे. त्यासाठी प्रत्येक सांगलीकराने एक पत्र मोदींना लिहावे, असे नियोजन केले आहे. पन्नास हजार पत्रे पोहचल्यानंतर पंतप्रधान कार्यालय नक्कीच दखल घेईल, अशी आशा आहे. मोदीजी, हल्दी नगरी को दिजीए नई उडाण, कवलापूर एअरपोर्ट बनेगा, समृद्ध सांगली की पहचान’, असा नारा देणारा पत्रव्यवहार आहे. त्यासाठी जागोजागी स्टॉल लावले जातील. शाळा, महाविद्यालयांत जावून पत्र दिली जातील, असेही ते म्हणाले.