सांगलीतील आष्टा येथील पुरातन विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी खुले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 02:26 PM2022-12-06T14:26:59+5:302022-12-06T15:17:29+5:30
याप्रश्नी भाविकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
आष्टा : आष्टा येथील पत्र्याच्या शेडमध्ये बंदिस्त केलेल्या विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व निशिकांत पाटील युथ फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण माने व सहकाऱ्यांनी भाविकांसाठी खुल्या केल्या.
आष्टा येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर जीर्णोद्धारासाठी उतरविण्यात आल्यानंतर मंदिराच्या मूर्ती गाभाऱ्याच्या जागेवरच एका पत्र्याच्या खोक्यात बंदिस्त करण्यात आल्या होत्या. मात्र जीर्णोद्धाराचे काम रखडल्याने भाविकांना विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन होत नव्हते. मूर्ती दर्शनासाठी खुल्या करण्याची मागणी भाविकांकडून होत होती. याप्रश्नी भाविकांनी आंदोलनाचा इशाराही दिला होता.
मंदिराची उभारणी राहू दे, पण किमान मूर्ती तरी दर्शनासाठी खुल्या व्हाव्यात, यासाठी प्रत्येक जण आपापल्या परीने यासाठी प्रयत्न करत होता. भागवत एकादशी दिवशी प्रवीण माने व सहकारी यांनी विठ्ठलाच्या जयघोषात मूर्तीभोवती असणारे जीर्ण झालेले पत्रे काढले. मूर्ती स्वच्छ केल्या. अभिषेक व आरतीही केली आणि भाविकांसाठी विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती दर्शनासाठी खुल्या केल्या.