जयंत पाटलांच्या दबावामुळेच माणगंगा कारखान्यात घात, अमरसिंह देशमुखांचा आरोप
By श्रीनिवास नागे | Published: June 1, 2023 02:29 PM2023-06-01T14:29:01+5:302023-06-01T14:29:19+5:30
निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले नाही
आटपाडी : माणगंगा साखर कारखान्यात राष्ट्रवादीच्या नेत्यांनी षडयंत्र आखले. त्यांनी काँग्रेस, शिवसेनेच्या साथीने शेकापवर राजकीय दबाव टाकला, असा आरोप जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा कारखान्यातील मावळत्या सत्ताधारी गटाचे नेते अमरसिंह देशमुखयांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता केला. या दबावामुळे सांगोल्याच्या देशमुख गटाने अचानक अर्ज मागे घेतले. त्या निर्णयाने विश्वासघात झाल्याची भावनाही त्यांनी व्यक्त केली. येथील माणगंगा कारखान्याच्या निवडणुकीत अर्ज माघारी घेत विरोधकांच्या ताब्यात सत्ता दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
देशमुख म्हणाले की, साखर कारखाना उभारण्यापूर्वी १९८० पासून आटपाडीचे बाबासाहेब देशमुख व सांगोल्याचे गणपतराव देशमुख यांचे नैसर्गिक नाते होते. दोन्ही गटांकडून अर्ज भरले जात होते. यावेळी दिवंगत गणपतराव देशमुखांचे नातू डॉ. बाबासाहेब यांच्याशी चर्चा झाल्यानंतर त्यांनी सांगोला तालुक्यातून, तर आटपाडीमधून आम्ही अर्ज दाखल केले होते. मात्र माघारीच्या दिवशी अचानक दोन वाजता त्यांनी अर्ज काढून घेत नात्याला तडा दिला. त्यांची भूमिका संशयास्पद असून राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेना (शिंदे गट) यांच्या दबावाखाली त्यांनी निर्णय घेतला.
राज्यातील राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून आमच्या कुटुंबावर अन्याय झाला असून आम्ही राष्ट्रवादीमध्ये असतानाही उपेक्षितच ठेवले गेले. भाजपमध्ये गेल्यावर राष्ट्रवादीने जिल्हा बँकेच्या निवडणुकीपासून आजअखेर सूड घेण्याचे काम केले, असा आरोप त्यांनी जयंत पाटील यांचे नाव न घेता केला.
विरोधकांकडून चुकीचा प्रचार
विरोधकांनी कारखाना खासगी होणार असल्याच्या अफवा पसरवल्या. जिल्हा बँकेने कारखाना विक्रीसाठी काढला होता, त्यावेळीच खासगीकरण झाले असते. मात्र कोणीच निविदा भरली नाही. बँकेने कारखाना चालवण्यास देण्यासाठी निविदा काढल्यानंतर आम्ही एकट्यानेच भरली. त्यावेळीही बँकेने तीन महिने ती खुली न करताच पैसे परत केले होते. ते राष्ट्रवादीचेच षडयंत्र होते.
आमदारांनी गटाला थांबवले नाही
शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांची भेट घेतली असता त्यांनी निवडणूक लढवणार नसल्याचे सांगितले होते. त्यांनी या प्रक्रियेमध्ये प्रत्यक्ष सहभाग घेतला नाही, मात्र आपल्या गटाला निवडणूक लढवण्यापासून ते परावृत्त का करू शकले नाहीत, असे देशमुख म्हणाले.
भाजपची साथ नाहीच!
निवडणुकीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घातले नाही. त्यांची साथ असती तर वेगळे चित्र दिसले असते. विधानसभेवेळी बाबर यांना सहकार्यासाठी भाजप व वरिष्ठ नेत्यांनी साकडे घातले गेले, मात्र कारखान्याबाबत सहकार्यासाठी कोणीही पुढाकार घेतला नाही, असे देशमुख म्हणाले.