सांगली जिल्ह्यात महाआघाडीच्या प्रतिष्ठेची अन् महायुतीच्या अस्तित्वाची लढाई

By हणमंत पाटील | Published: October 23, 2024 04:33 PM2024-10-23T16:33:46+5:302024-10-23T16:35:02+5:30

सांगली, मिरज, खानापूर विधानसभा आघाडीकडून लक्ष्य

The battle for the prestige of MahaAghadi and the existence of MahaYuti in Sangli district | सांगली जिल्ह्यात महाआघाडीच्या प्रतिष्ठेची अन् महायुतीच्या अस्तित्वाची लढाई

सांगली जिल्ह्यात महाआघाडीच्या प्रतिष्ठेची अन् महायुतीच्या अस्तित्वाची लढाई

हणमंत पाटील

सांगली : लोकसभा निवडणुकीत सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीचे नेते जयंत पाटील व विश्वजित कदम यांचा आत्मविश्वास वाढला. त्यामुळे महायुतीकडे असलेले जिल्ह्यातील सांगली, मिरज व खानापूर हे तिन्ही विधानसभा मतदारसंघ मिळविण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मात्र, या तिन्ही मतदारसंघांतील वर्चस्व कायम ठेवण्याचे आव्हान महायुतीचे जिल्ह्यातील पालकमंत्री सुरेश खाडे व आमदार सुधीर गाडगीळ यांच्यापुढे आहे.

लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सहा विधानसभा सांगली आणि दोन विधानसभा हातकणंगले लोकसभा मतदारसंघात आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केवळ जत विधानसभेचा अपवाद वगळता असता. उर्वरित सात विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील व काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मताधिक्य मिळाले. विशेष म्हणजे, भाजपचे विद्यमान आमदार असलेले सांगली, मिरज आणि शिंदेसेनेकडे असलेल्या खानापूर मतदारसंघातही १६ ते २४ हजारांचे मताधिक्य विरोधी पक्षाला मिळाले. त्यामुळे सांगली लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार व माजी खासदार संजय पाटील यांचा पराभव झाला.

आगामी विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे समीकरण कायम राहणार नाहीत. तरीही जिल्ह्यातील महायुतीकडे असलेल्या या तिन्ही विधानसभा मतदारसंघांतील लोकसभेचे मताधिक्य मागे टाकण्याचे आव्हान महायुतीच्या जिल्ह्यातील नेत्यांपुढे आहे. लोकसभा मतदारसंघातील सांगली विधानसभेत १९ हजार, मिरज २४ हजार आणि खानापूर १६ हजारांचे मताधिक्य काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना मिळाले होते.

हातकणंगले लोकसभेतील आघाडीचे मताधिक्य..

हातकणंगले लोकसभेतील इस्लामपूरमध्ये १७ हजार आणि शिराळा विधानसभेत ९ हजारांचे मताधिक्य महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांना मिळाले होते. त्यामुळे विधानसभा निवडणूक ही महायुतीच्या नेत्यांपुढे अस्तित्वाची व वर्चस्व कायम ठेवण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे.

२०१९चे सांगली जिल्ह्यातील पक्षीय बलाबल

  • भाजप : २
  • शिंदेसेना : १
  • राष्ट्रवादी : ३
  • काँग्रेस : २
  • एकूण : ८


जिल्ह्यातील २०२४च्या लोकसभेतील विधानसभानिहाय मतदान

  विशाल पाटील संजय पाटील चंद्रहार पाटील
मिरज १,०९,११० ८४,०२९ ८,०२१
सांगली १,०५,१८५ ८५,९९३ ७,१५६
कडेगाव-पलूस ९५,५५८ ५९,३७६ १३,८५९
खानापूर ९२,४५९ ७५,७९५ १६,९५६
तासगाव-क.महांकाळ ९४,४८५ ८५,०७४ ७,९४९
जत ७२,८५४ ७९,१२५ ६,१७४

 

Web Title: The battle for the prestige of MahaAghadi and the existence of MahaYuti in Sangli district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.