सांगलीत सेल्फी घेताना कृष्णेत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तब्बल ४८ तासांची शोधमोहीम

By संतोष भिसे | Published: July 9, 2024 05:10 PM2024-07-09T17:10:53+5:302024-07-09T17:11:30+5:30

मृतदेहाचा सुमारे ४० किलोमीटर प्रवास, पोहायला येत असूनही प्रवाहात तग धरु शकला नाही

The body of a young man who drowned in the Krishna river while taking a selfie was found in Sangli | सांगलीत सेल्फी घेताना कृष्णेत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तब्बल ४८ तासांची शोधमोहीम

सांगलीत सेल्फी घेताना कृष्णेत बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, तब्बल ४८ तासांची शोधमोहीम

सांगली : येथील कृष्णा नदीच्या बंधाऱ्यावर सेल्फी घेताना पाण्यात पडलेल्या तरुणाचा मृतदेह शिरटी (ता. शिरोळ) येथे मंगळवारी सकाळी सापडला. त्याच्या शोधासाठी तब्बल ४८ तास शोधमोहीम राबविण्यात आली. मृतदेहाने नदीतून सुमारे ४० किलोमीटर प्रवास केला.

मोईन मोमीन (वय २४, हनुमाननगर, सांगली) असे तरुणाचे नाव आहे. रविवारी (दि. ७) दुपारी कृष्णेत सांगलीवाडीकडील बाजूला बंधाऱ्यावर सेल्फी घेताना तोल जाऊन तो पाण्यात पडला होता. पावसामुळे नदीपात्र भरुन वाहत आहे, तसेच पाण्याला वेगही जास्त आहे, त्यामुळे तो वाहून गेला. पोहायला येत असूनही प्रवाहात तग धरु शकला नाही. त्याच्या शोधासाठी पोलिसांसह विविध यंत्रणा नदीकाठी फिरत होत्या. सोमवारी दिवसभर ठिकठिकाणी शोध घेण्यात आला.

मंगळवारी सकाळी म्हैसाळ (ता. मिरज) येथे बंधाऱ्यावरुन मृतदेह पुढे वाहत गेल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. तेथे पोहोचेपर्यंत मृतदेह पुन्हा पुढे वाहत गेला. अखेर शिरटी (ता. शिरोळ) येथे त्याला बाहेर काढण्यात यश आले. सांगलीतील आयुष हेल्पलाईन टीमच्या स्पेशल रेस्क्यू फोर्सने शोध मोहिमेत भाग घेतला.

मोईन बॉक्सिंग प्रशिक्षक

मोईन हा बॉक्सिंग प्रशिक्षक होता. सांगलीत मैत्रिणीसोबत रविवारी कृष्णाकाठावर आला होता. तो नदीत पडल्यानंतर पोलिसांनी शोधमोहीम राबवली, पण पाण्याचा प्रवाह वाढल्याने अडथळा निर्माण होत होता. शोधमोहिमेत आयुष हेल्पलाईनचे अविनाश पवार, रुद्र कारंडे, चिंतामणी पवार, विक्रम ऐवळे, सूरज शेख, कैलास ओळख, शिवराज टाकळी, सचिन कांबळे, योगेश मदने, साहिल जमादार, प्रशांत घोडके, प्रणव जाधव, ओमकार माने, आदित्य जाधव यांच्यासह स्थानिक नागरिक, पोलिस व अग्निशमन दलाच्या जवानांनी भाग घेतला.

Web Title: The body of a young man who drowned in the Krishna river while taking a selfie was found in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.